मदरसांमध्ये दिले जातात दहशतवादाचे धडे - भाजप खासदार
By Admin | Updated: September 14, 2014 16:25 IST2014-09-14T16:25:54+5:302014-09-14T16:25:54+5:30
भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनीदेखील नवीन वाद निर्माण केला आहे.

मदरसांमध्ये दिले जातात दहशतवादाचे धडे - भाजप खासदार
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १४ - भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनीदेखील नवीन वाद निर्माण केला आहे. मदरसांमध्ये राष्ट्रप्रेमाऐवजी फक्त दहशतवादाचेच धडे दिले जातात असे विधान साक्षी महाराज यांनी केले आहे.
उत्तरप्रदेशमधील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या साक्षी महाराज यांनी थेट मदरसांमध्ये दिल्या जाणा-या शिक्षणावरच हल्लाबोल केला. मदरसांमध्ये दहशतवादाचे धडे दिले जात असून तिथे फक्त कुराणाचे शिक्षण दिल्यास दहशतवादी आणि जिहादी तयार होऊ शकतात व हे राष्ट्रहितासाठी चांगले नाही असे साक्षी महाराज यांनी सांगितले. उत्तरप्रदेशमधील अनेक शाळांना सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नसताना राष्ट्रप्रेमाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या मदरसांना आर्थिक मदत दिली जाते असे निदर्शनास आणून देत त्यांनी सत्ताधारी अखिलेश यादव यांच्या सरकारवर टीका केली.
साक्षी महाराज यांच्या विधानाचा समाजवादीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी कडाडून विरोध केला. साक्षी महाराज यांचे विधान निंदनीय असून या विधानातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. कोणताही धर्म दहशतवादाला समर्थन देत नाही. साक्षी महाराज यांनी इस्लाम व मदरसांना दहशतवादाशी जोडणे हे निषधार्हच आहे असे चौधरी यांनी नमूद केले.