संघाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले - राहुल गांधी
By Admin | Updated: December 14, 2015 15:00 IST2015-12-14T13:08:37+5:302015-12-14T15:00:57+5:30
आसाम दौ-यावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला बारपेटा येथील मंदिरात जाण्यापासून रोखले असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

संघाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले - राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - आसाम दौ-यावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला बारपेटा येथील मंदिरात जाण्यापासून रोखले असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. संघाच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य म्हणजे भाजपाचे राजकारण असून ते कोणत्याही परिस्थिती स्वीकारार्ह नाही, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज संसदेबाहेर सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी बोलताना राहुल यांनी पंजाबमधील बिघडलेले कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण तसेच केरळमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ओमेन चंडी यांना निमंत्रण न देणे यावर कडाडून टीका केली.केरळच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न देवून पंतप्रधानांनी केरळमधील नागरिकांचा अपमान केला आहे, असेही ते म्हणाले.
त्याचवेळी त्यांनी आसाम दौ-या घडलेल्या घटनेबाबतही माहिती दिली. मी आसाम दौ-यावर गेलेलो असताना मला बारपेटा जिल्ह्यातील एका मंदिराला भेट द्यायची होती, मात्र मंदिराजवळ पोहोचताच आरएसएस कार्यकर्त्यांनी मला आत जाण्यापासून रोखले. मंदिरासमोर महिलांना उभे करत त्यांना मला मंदिरात प्रवेश करू दिला नाही, असे उद्विग्न राहुल यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखणारे ते कोण लागून गेले? असा सवालही त्यांनी विचारला.
आरएसएसने मात्र राहुल यांचे हे आरोप फेटाळून लावत त्यांना अडवणा-या महिला या संघाच्या कार्यकर्त्या होत्या, हे त्यांना कसे माहीत असा सवाल विचारला आहे.