टीम मोदी ठरली, गडकरी, राजनाथ सिंहांचा समावेश निश्चित
By Admin | Updated: May 25, 2014 20:31 IST2014-05-25T20:31:05+5:302014-05-25T20:31:50+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिरवा कंदील दाखवल्यावर भाजपने मोदींची टीम तयार केली असून लवकरच याविषयी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

टीम मोदी ठरली, गडकरी, राजनाथ सिंहांचा समावेश निश्चित
नवी दिल्ली, दि. २५ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिरवा कंदील दिल्यावर नरेंद्र मोदींचे मंत्रिमंडळ निश्चित झाले असून टीम मोदीमध्ये नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे, वैंकेय्या नायडू यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याविषयी भाजपने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून रविवारी रात्री राष्ट्रपतींकडे मंत्रिमंडळाची यादी सोपवण्यात येणार असून यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल.
भरघोस मताधिक्य मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. १६ मेरोजी लोकसभेचा निकाल लागला असला तरी गेल्या दहा दिवसांपासून भाजपात मोदींच्या मंत्रिमंडळाव विचारमंथन सुरु होते. सोमवारी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याने त्याच दिवशी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही शपथ घेणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या निश्चितीसाठी भाजप व एनडीएतील मित्रपक्षांमध्ये भेटीगाठीचा सिलसिला सुरु होता. रविवारी सकाळीही मित्रपक्षाच्या नेत्यांनी तसेच भाजपमधील इच्छुकांनी मोदींची गुजरात भवनमध्ये भेट घेतली.
शपथविधीला चोवीस तासांहून कमी अवधी शिल्लक असतानाच भाजपने टीम मोदीची निवड केली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संघनेत्यांची भेट घेत संघप्रमुखांना ही यादी दाखवली असून संघाने या यादीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे मोदींचे मंत्रिमंडळ निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून सोमवारी शपथविधी सोहळ्यापूर्वी अधिकृतरित्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहे.
यांचा समावेश निश्चित
राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, वैंकेय्या नायडू, रविशंकर प्रसाद, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, सुषमा स्वराज, व्ही. के.सिंग, हर्षवर्धन, उमा भारती, बंगारु दत्तात्रय, राजीवप्रसाद रुडी यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश निश्चित असल्याचे वृत्त आहे. मात्र यापैकी कोणाला कोणत्या खात्याचा कार्यभार दिला जातो हे अद्याप समजू शकलेले नाही.
लोकसभा अध्यक्षपदाचे दावेदार
सुमित्रा महाजन, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, कारिया मुंडा या नेत्यांची नावे लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.