उशीरा पोचल्याने संघाने रद्द केले व्ही. के. सिंहांचे भाषण
By Admin | Updated: November 3, 2014 17:04 IST2014-11-03T13:57:24+5:302014-11-03T17:04:43+5:30
आरएसएसच्या शिबीरात उशीरा पोहोचल्याने परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांचे भाषण रद्द करण्यात आले.

उशीरा पोचल्याने संघाने रद्द केले व्ही. के. सिंहांचे भाषण
>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. ३ - प्रमुख वक्त्याची वाट पाहत तासनतास ताटकळत बसलेले श्रोते हे दृष्य काही नवीन नाही, पण वक्ता उशीरा पोहोचल्याने त्याचे सत्र रद्द करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय शिबिरादरम्यान एका सत्रात परराष्ट्र व्यवहार (राज्यमंत्री) जनरल व्ही. के. सिंग यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते, मात्र कार्यक्रमस्थळी दीड तास उशीरा पोहोचल्याने त्यांचे भाषण करम्याची परवानगी नाकारण्यात आली.
आग्रा येथे आरएसएसचे तीन दिवसीय 'युवा संकल्प शिबीर' आयोजित करण्यात आले होते. रविवारी सकाळी ११ वाजता व्ही. के. सिंह 'भारताचे संरक्षण व सुरक्षाविषयक धोरण' या विषयावर संबोधित करणार होते. मात्र ते वेळेवर न पोचू शकल्याने त्यांचे सत्र रद्द करून नियोजित कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास तेथे पोचलेल्या सिंग यांना उशीरा येण्याची किंमत चुकवावी लागली. त्यांना इतर मान्यवरांसोबत नव्हे तर त्यांच्या मागे दुस-या रांगेत बसावे लागले आणि त्यांना भाषणाची संधी न देता शिबीरातील इतर कार्यक्रम सुरू राहिले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते.
'कोणासाठीही कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलणे हे संघाच्या तत्वात बसत नाही. सिंह यांचे भाषण ११ वाजता होते, त्यामुळे त्यांनी त्याआधीच कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र ते साडेबारानंतर आले. उशीरा पोहोचल्याने त्यांना भाषणाद्वारे तरूणापर्यंत विचार पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली नाही', असे संघाचे प्रवक्ते वीरेंद्र वर्षानेय यांनी सांगितले. 'नियम हे नियम असतात आणि ते सर्वांसाठी समान असतात. इतरांना शिस्तीचे धडे देण्याआधी आपण स्वत:च्या अंगी शिस्त बाणवली पाहीजे,' असेही ते म्हणाले.
दरम्यान परदेशी जाण्यासाठी विमान पकडायचे असल्याचे कारण देत सिंह तेथून अर्ध्या तासात निघाले तसेच कोणतीही प्रतिक्रिया देण्यासही त्यांनी नकार दिला.