निवडणूक कामासाठी टॅक्सीचालकांना ४८ तासांची सक्ती
By Admin | Updated: September 23, 2014 02:56 IST2014-09-23T02:33:13+5:302014-09-23T02:56:30+5:30
निवडणूक कामासाठी टॅक्सींना मोठ्या प्रमाणात मागणी असून, यंदाही विधानसभा निवडणुकीत टॅक्सींचा वापर केला जाणार आहे.

निवडणूक कामासाठी टॅक्सीचालकांना ४८ तासांची सक्ती
मुंबई : निवडणूक कामासाठी टॅक्सींना मोठ्या प्रमाणात मागणी असून, यंदाही विधानसभा निवडणुकीत टॅक्सींचा वापर केला जाणार आहे. यासाठी टॅक्सीचालकाला भाडे दिले जाणार आहे. मात्र हे भाडे देताना ४८ तासांच्या ड्युटीची अट त्यांना घालण्यात आली आहे. ४८ तासांची ड्युटी पूर्ण न केल्यास मग २४ तासांचेच भाडे टॅक्सीचालकांना मिळणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी खासगी वाहनांचा व टॅक्सीही वापरण्यात येतात. २00९च्या निवडणुकीत पाच टॅक्सी संघटनांना या कामासाठी होत्या. कुलाबा ते मुलुंडपर्यंत प्रत्येक विभागातील निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी एकूण २ हजार २00 टॅक्सी उपलब्ध केल्या होत्या; तसेच पोलिसांसाठी ६0 टॅक्सी होत्या. त्या वेळी २४ तासांसाठी १,२00 रुपये भाडे ठरवण्यात आले होते. त्यानंतर २0१४च्या लोकसभा निवडणुकीत १,५00पेक्षा जास्त टॅक्सींची मागणी आरटीओकडून करण्यात आली. २४ तासांसाठी १,८३0 रुपये आणि १00 किलोमीटरनंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १२ रुपये टॅक्सीचालकांना त्या वेळी देण्यात आले. मात्र या वेळी २000 रुपये भाडे देण्यात यावे, अशी मागणी टॅक्सीचालकांकडून आरटीओकडे करण्यात आली होती. या मागणीला आरटीओने नुकत्याच झालेल्या बैठकीत धुडकावले असून, १,८५0 रुपये देणे मान्य केले आहे. (प्रतिनिधी)