बनावट कंपन्यांच्या करचुकवेगिरीला चाप
By Admin | Updated: February 11, 2015 23:57 IST2015-02-11T23:57:29+5:302015-02-11T23:57:29+5:30
आयकर विभागाने आम आदमी पार्टी, काँग्रेससह दिल्लीतील ५० वर कंपन्यांना बुधवारी नोटीस जारी करीत धडक कारवाईचे संकेत दिले आहेत

बनावट कंपन्यांच्या करचुकवेगिरीला चाप
नवी दिल्ली : आयकर विभागाने आम आदमी पार्टी, काँग्रेससह दिल्लीतील ५० वर कंपन्यांना बुधवारी नोटीस जारी करीत धडक कारवाईचे संकेत दिले आहेत. धनादेशाच्या माध्यमाने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग अवलंबला जात असून बनावट कंपन्यांच्या नावावर होत असलेल्या या करबुडवेगिरीला आळा घालण्यासाठी आयकर विभाग सरसावला आहे.
अनेक बनावट कंपन्या किंवा एन्ट्री आॅपरेटर कंपन्यांमार्फत बेकायदा रोख कायदेशीर पैशात रूपांतरित करण्याचे प्रकार सुरू आहेत. राजकीय पक्षांना काळा पैसा देणगी रूपात देत तो पांढरा केला जात आहे. यापूर्वी कोलकात्यात अशी प्रकरणे प्रकाशात आली होती, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांच्या सूत्रांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल चौफेर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असलेल्या आम आदमी पार्टीला आयकर विभागाने निवडणूक निधीबाबत नोटीस पाठविल्याचे वृत्त सर्वप्रथम धडकले. गेल्यावर्षी चार बनावट कंपन्यांकडून आम आदमी पार्टीला दोन कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचा आरोप या पक्षातून फुटून निघालेल्या स्वयंसेवी गटाने केल्यानंतर दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान आरोपांचा धुरळा उठला होता. या प्रकरणाची दखल घेत आयकर विभागाने ‘आप’ला १६ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक दस्तऐवज सादर करण्याचा आदेश देतानाच अन्यथा १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला होता.
गोल्डमाईन बिल्डकॉन प्रा. लिमिटेड, सनव्हिजन एजन्सीज प्रा. लिमिटेड, स्कायलाईन मेटल्स अॅॅण्ड अलॉय प्रा. लिमिटेड, इंफोलॉस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या चार कंपन्यांनी आपला १५ एप्रिल २०१४ रोजी प्रत्येकी ५० लाख रुपयांचे धनादेश दिल्याचा आरोप स्वयंसेवी गटाचे करणसिंग आणि गोपाल गोयल यांनी केला होता.
आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी हे आरोप फेटाळताना हे पक्षाविरुद्धचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट केले होते. आम्ही निवडणुकीपूर्वी म्हणजे ७ फेब्रुवारीच्या आधीच याबाबत तपासाचे आदेश देण्याचे, दोषी असल्यास अटक करण्याचे आवाहन केले होते, असे ते म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)