तारा शाहदेवचे आरोप खोटे, मी हिंदूच - रणजित कोहली
By Admin | Updated: August 27, 2014 13:48 IST2014-08-27T10:22:23+5:302014-08-27T13:48:53+5:30
मी हिंदूच असून तारा शाहदेवने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव यांचे पती रणजितकुमारने केला आहे.

तारा शाहदेवचे आरोप खोटे, मी हिंदूच - रणजित कोहली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवला इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी अमानूष मारहाण करणारा त्यांचा पती रकिबूल हसन खान उर्फ रणजितकुमार कोहली याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. मी हिंदूच असून तारा शाहदेवने केलेले आरोप खोटे आहेत असा दावाही रणजितकुमारने केला आहे.
झारखंडमधील राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव ही रांचीतील क्रीडा संकुलात नेमबाजीचा सराव करत असताना रणजितकुमार कोहली या तरुणाशी तिची ओळख झाली. रणजितचे मूळ नाव रकिबूल हसन खान असे असून ही बाब त्याने तारापासून लपवून ठेवली. लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी रणजितने आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप ताराने केला होता. 'लव्ह जिहाद'च्या या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती. ताराने पतीविरोधात रांची पोलिसांकडे तक्रार केली होती. रांची पोलिसांनी मंगळवारी रात्री रणजितकुमार कोहली उर्फ रकिबूल हसन खान याला दिल्लीतील द्वारका परिसरातून अटक केली आहे.
पोलिस चौकशीतही रणजितने हिंदू असल्याचा दावा केला असून पुरावा म्हणून त्याने पोलिसांना सरकारी कागदपत्रही दाखवल्याचे समजते. या कागदपत्रांवर रणजितकुमार कोहली हेच नाव असल्याचे समजते.
मी जन्माने हिंदूच आहे. तारा शाहदेवने तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी यासाठी मला धमकावले होते. मदत न केल्यास धडा शिकवीन असेही ताराने सांगितल्याचे कोहलीने म्हटले आहे. मात्र तो मुस्लीम आहे की नाही यावर त्याने ठोस उत्तर देणे टाळले आहे.