तापस पाल यांच्या पत्नीने मागितली माफी
By Admin | Updated: July 1, 2014 12:42 IST2014-07-01T12:41:46+5:302014-07-01T12:42:40+5:30
महिलांविषयी प्रक्षोभक विधान करणा-या तापस पाल यांच्यावतीने त्यांची पत्नी नंदिनी पाल यांनी माफी मागितली आहे.

तापस पाल यांच्या पत्नीने मागितली माफी
ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. १ - मार्क्सवादी महिलांवर बलात्कार करा असे प्रक्षोभक विधान करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरु झाल्यावर तापस यांची पत्नी नंदिनी पाल यांनी तापस यांच्या विधानासाठी माफी मागितली आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची दुसरीबाजूही आहे असे नंदिनी पाल यांनी म्हटले असले ही बाजू कोणती याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही.
तृणमूल काँग्रेसचे खासदार व अभिनेते तापस पाल यांनी पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना अत्यंत संतापजनक विधान केले होते. सत्ताधारी पक्षाच्या एकाही कार्यकत्र्यावर हल्ला झाल्यास माकपच्या कार्यकत्र्याना ठार मारले जाईल. या पक्षाच्या महिलांवर बलात्कार केले जातील, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला होता. हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर तापस पाल यांच्यावर टीकेची झोड उठली. यापार्श्वभूमीवर मंगळवारी नंदिनी पाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'मी तापस यांच्या विधानासाठी सर्वांची माफी मागते. या विधानाचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण या घटनाक्रमाला आणकी एक पैलू असून तापस यांना असे बोलण्यासाठी उकसवले गेले' असा दावाही नंदिनी यांनी केला. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही तापस सेन यांना कारणेदाखवा नोटीस बजावत ४८ तासांत स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे. तर काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट पक्षाच्या महिला नेत्यांनी तापस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.