तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तिरुचिरापल्लीहून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या एका सरकारी बसचा टायर अचानक फुटल्याने भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. समोरून येणाऱ्या दोन कारना या बसने इतक्या जोरात धडक दिली की, दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या हृदयद्रावक अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाची बस हायवेवरून वेगाने जात होती. अचानक बसचा टायर फुटला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनियंत्रित झालेली बस थेट डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये आली. यावेळी समोरून येणाऱ्या दोन कारना बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही कार बसच्या खाली अडकल्या गेल्या. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश
या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघांनी रुग्णालयात उपचारादरम्यान जीव सोडला. मृतांमध्ये ५ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये दोन चिमुरड्यांचाही समावेश असून त्यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
हायवेवर वाहतुकीचा खोळंबा
अपघाताची माहिती मिळताच तित्ताकुडी आणि रामनाथम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने बसखाली अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या. या अपघातामुळे चेन्नई-तिरुची नॅशनल हायवेवर कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्ता मोकळा करण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत झाली.
मुख्यमंत्री स्टालिन यांच्याकडून मदतीची घोषणा
या भीषण दुर्घटनेवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना प्रकट केल्या असून तातडीने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ३ लाख रुपये आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री मदत निधीतून दिली जाणार आहे. तसेच जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Web Summary : A bus tire burst in Cuddalore, Tamil Nadu, causing a devastating accident. The bus collided with two cars, killing nine and injuring four. Financial aid announced for victims by Chief Minister Stalin.
Web Summary : तमिलनाडु के कडलूर में एक बस का टायर फटने से भीषण हादसा हो गया। बस ने दो कारों को टक्कर मार दी, जिससे नौ लोगों की मौत हो गई और चार घायल हो गए। मुख्यमंत्री स्टालिन द्वारा पीड़ितों के लिए वित्तीय सहायता की घोषणा की गई।