सरकारी नोकरी मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
By कुणाल गवाणकर | Updated: November 2, 2020 13:33 IST2020-11-02T13:30:19+5:302020-11-02T13:33:54+5:30
मुंबईतील बँकेत नोकरी लागल्यानंतर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

सरकारी नोकरी मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
कन्याकुमारी: तामिळनाडूतल्या कन्याकुमारीत एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी नोकरी मिळाल्यामुळे तरुणानं आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या तरुणाला बऱ्याच महिन्यांपासून नोकरी नव्हती. त्यामुळे तो निराश होता. नोकरीसाठी प्रयत्न करूनही यश मिळत नसल्यानं त्यानं नवस केला होता.
नोकरी मिळत नसल्यानं निराश झालेल्या तरुणानं शेवटचा उपाय म्हणून देवाकडे नवस केला. मला नोकरी मिळाल्यास आयुष्याचा त्याग करून तुला शरण येईन, असा नवस तरुणानं केला होता. नवस बोलल्यानंतर काही दिवसांतच तरुणाला मुंबईतल्या बँक ऑफ बदोडातल्या शाखेत नोकरी मिळाली. तो तिथे रुजू झाला. १५ दिवस त्यानं नोकरी केली. शुक्रवारी तो त्रिवेंद्रमसाठी निघाला. त्यावेळी त्यानं स्वत:ला रेल्वे रुळांवर झोकून दिलं आणि जीवन संपवलं.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव नवीन असं असून तो कन्याकुमारी जिल्ह्यातल्या नागरकोईलचा रहिवासी आहे. नवीनच्या मृतदेहाशेजारी रेल्वे पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामधून नवीनच्या आत्महत्येमागच्या कारणाचा उलगडा झाला. 'मला नोकरी मिळाल्यास देवाला शरण जाईन, असा नवस केला होता. त्यामुळे मी देवाकडे जात आहेत,' असा मजकूर नवीनच्या मृतदेहाशेजारील चिठ्ठीत आढळून आला.