तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यातील आपले युवा नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना ऊमेदवारी न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तसेच भाजपाने अन्नामलाई यांना उमेदवारी का नाकारली असावी, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावर आता खुद्द अन्नामलाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अन्नामलाई यांनी तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपाने उमेदवारी न देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी यावेळी कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवत नाही आहे. निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी स्वत:च घेतला आहे. मी कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही, असे मी कोअर कमिटीला पत्र लिहून आधीच सांगितले होते, असेही अन्नामलाई यांनी सांगितले.
यावेळी तिकीट नाकारण्यावरून पक्षावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अन्नामलाई यांनी सांगितले की, जर मीच निवडणूक लढवून इच्छित नव्हतो, तर पक्ष मला उमेदवारी कशी देईल? जर मीच स्वत:ला मर्यादित ठेवू इच्छित असेन तर गोष्ट वेगळी होती. अन्यथा मी कुठूनही निवडणूक लढवू शकतो.
अन्नामलाई यांनी आपल्याला सन्मान दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. मी पूर्ण ताकदीनिशी एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करेन, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच देशातील सत्ताधारी पण तामिळनाडूमध्ये किरकोळ अस्तित्व असलेल्या भाजपाने यावेळची विधानसभेची निवडणूक एनडीएतील मित्रपक्षांसोबत मिळून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएमधील जागावाटपात भाजपाच्या वाट्याला केवळ २७ जागा आल्या आहेत.