बोलाची कढी..
By Admin | Updated: October 7, 2014 01:35 IST2014-10-07T01:35:23+5:302014-10-07T01:35:23+5:30
गेले दोन दिवस महाराष्ट्र शतप्रतिशत मोदीमय आहे. मोदीही महाराष्ट्राच्या नागरी समस्यांपेक्षा, त्यांचा अमेरिकेचा दौरा, गुजरातविकास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र यावरच जास्त बोलले.

बोलाची कढी..
जनक्षोभ की आंधी
गेले दोन दिवस महाराष्ट्र शतप्रतिशत मोदीमय आहे. मोदीही महाराष्ट्राच्या नागरी समस्यांपेक्षा, त्यांचा अमेरिकेचा दौरा, गुजरातविकास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र यावरच जास्त बोलले. बोलत आहेत. या दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, असे विधान करून मोदींनी सत्ताधारी भाजपा पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल शिवसेनेने मनात धरलेला राग अधिक पसरू नये, असाही एक प्रयत्न केला. दुसरीकडे, केंद्रीय मंत्रीमहोदय माननीय नितीनजी गडकरी यांनी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून मिळेल तितका पैसा घ्या, पण मत भाजपाच्या उमेदवाराला द्या आणि आनंदाने दिवाळी साजरी करा, असा सल्ला देऊन निरभ्र आणि निखळ भारत बनविण्याच्या कामी लागलेल्या मोदी सरकारच्या स्वच्छ भारताच्या स्वप्नाची जणू वाटच स्पष्ट केली. तिकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बहुतेक मोठे नेते, ज्यात आता सन्माननीय आदित्य ठाकरे यांचाही समावेश होतो. ते संधी साधून साधून भाजपाने त्यांच्याशी केलेल्या विश्वासघातावर घणाघात करत आहेत. तर राज ठाकरे आणि शरद पवार हेही मोदींना गुजरातचे पंतप्रधान म्हणून मोडीत काढत आहेत. बाकी राष्ट्रीय काँग्रेसचा प्रचार म्हणाल, तर नारायण राणे हे नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांना गिऱ्हाईक करता करता अचानक आठवण आली, की मोदींना टारगट भाषेत टार्गेट करू बघताहेत. पण शब्द तेच, तीच भाषा आणि तेच तेच आरोप! राहुल गांधी... त्याचं तर नावच टाकून दिलंय सगळ्यांनी. सोनियांनाही नाही म्हणण्याइतकं धाडस बहुधा अजून गोळा झालेलं नाही म्हणून असेल कदाचित, पण त्या ९ तारखेला महाराष्ट्रदेशी येताहेत. त्या तरी येऊन काय असं बोलणार आहेत म्हणा?
शरद पवार, आता दादा सुधारले आहेत म्हणता म्हणता, आपण स्वत:च ग्रामीण शिवीगाळीतले प्रेमळ शब्द हलकेच पेरून भाषणं करू लागलेत. आणि अजितदादा तर पृथ्वीराज चव्हाणांबद्दलच्या त्यांच्या मनातील घट्ट अढीतून बाहेरच यायला तयार नाहीत. बाकी रामदास आठवले किंवा त्यांचे त्यांच्या या, कथित युतीतील सदस्य नेते तर दिसणं सोडा, पुसटसे ऐकायलादेखील येत नाहीयेत. खरं तर यातूनच या वेळच्या निवडणुकीचा एकूण कल स्पष्ट होतो आहे. महाराष्ट्राच्या लोकअडचणींपेक्षा, निवडणुकीत आडकाठीच्या ठरलेल्या आपापसातील मत-मनभेदांवर जाहीरपणे बोलून, परस्परांवर सूड उगवण्याच्या अहमहमिकेत गुंतलेली एकूणच नेतेमंडळी, निवडणूकपश्चात, सत्तेसाठी पुनश्च युती-आघाडी बंधनात एकत्र येतील, येणार आहेत, हे न कळण्याइतकी जनता आता मूर्ख राहिली नाही. मोदी, उद्धव आणि राज यांच्या सभा सोडल्या तर बाकी कुणाही नेत्यांच्या प्रचारसभांना गर्दी नाही. याचा अर्थ या तिघांना लोक गांभीर्याने घेताहेत, असंही ठामपणाने म्हणता येणार नाही. मोदींच्या सभेत लोक कचरा करतात आणि शिवसेनेचे लोक तो उचलून भाजपाचा प्रभाव उघडा पाडू बघतात. पुरेसं बोलकं चित्र आहे. या वेळी लाट जनमताची आहे. ना मैं अण्णा हूँ ना हूँ केजरीवाल। धरतीपुत्र हूँ हम शिवबाके शिवलाल।। भले भले वाहून जाणार आहेत. ना मोदी ना पवार ना गांधी ये है जनक्षोभ की आंधी. जाणता मतदार कुणाही नेत्याच्या निव्वळ बोलाच्या कढीला भाळेल असं आता दिसत नाही. नेमकं आणि निश्चिंत मतदान होणार आहे. ज्याला त्याला आपली लायकी निश्चित कळणार आहे. - राजेंद्र शिखरे