सेंटूर हॉटेल विक्रीची फेरचौकशी करा
By Admin | Updated: September 15, 2014 03:49 IST2014-09-15T03:49:56+5:302014-09-15T03:49:56+5:30
काँग्रेसने मुंबईत १४ वर्षांपूर्वी झालेल्या दोन सेंटूर हॉटेल विक्रीची फेरचौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

सेंटूर हॉटेल विक्रीची फेरचौकशी करा
नवी दिल्ली : उदयपूरच्या लक्ष्मी विलास पॅलेस हॉटेल विक्रीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईत १४ वर्षांपूर्वी झालेल्या दोन सेंटूर हॉटेल विक्रीची फेरचौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
मोदी यांनी काँग्रेस सरचिटणीस संजय निरुपम यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या प्रकरणात संबंधित सरकारी अधिकारी आणि मंत्र्यासह कारस्थानी लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करता यावे म्हणून सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केले पाहिजे, असे निरुपम यांनी पत्रात म्हटले आहे. भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या कार्यकाळात वर्ष २००१-२००२ मध्ये भारतीय हॉटेल महामंडळाचे या दोन हॉटेलच्या विक्रीच्या चौकशीबद्दल काहीच कळले नव्हते, असे सांगून निरुपम यांनी मुंबईच्या दोन सेंटूर हॉटेलच्या विक्रीप्रकरणी फेरचौकशीची मागणी केली आहे.
या दोन सेंटूर हॉटेलमधील एक हॉटेल मुंबईतील जुहूमध्ये आणि दुसरे विमानतळावर होते. एअरपोर्ट सेंटूर हॉटेल प्रारंभी ८३ कोटी रुपयांना बत्रा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ला विकण्यात आले होते. मात्र, निर्गुंतवणुकीच्या चार महिन्यातच बत्रा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ने ही मालमत्ता ३२ कोटी रुपयांच्या फायद्यासाठी सहारा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ला विकून टाकली. विशेष म्हणजे दोन वर्षांपर्यंत हॉटेल कुणालाही विकता येणार नसल्याचे करारात नमूद होते, असा दावा निरुपम यांनी केला.
अशाप्रकारेच बत्रा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. ने भारत सरकारशी झालेल्या कराराचा भंग केला आणि ३१७ खोल्यांचे जुहू सेंटूर हॉटेल १५३ कोटी रुपयांमध्ये ट्युलिप हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रा. लि.ला विकले. (वृत्तसंस्था)