नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयानेमहाराष्ट्र सरकारला बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनमहाराष्ट्रातील गृह विभागाला पत्र दिलं आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात आलेल्या रिपोर्टचा हवाला देत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होते. शेवाळे यांनी टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) च्या अहवालावरून बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला.
नुकतेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता. मुंबई पोलिसांनी ३० वर्षीय बांगलादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम याला सैफवरील हल्ल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्सने बांगलादेशी घुसखोरांवर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक रिपोर्ट जारी केला होता. त्या रिपोर्टनुसार, बांगलादेश आणि म्यानमारहून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करणाऱ्यांमुळे मुंबईत सामाजिक आर्थिक गंभीर परिणाम होत आहेत असं म्हटलं होते.
या अवैध बांगलादेशींमुळे शहरातील मजुरांना रोजगार मिळत नाहीत. मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. १९६१ साली मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्के होती, जी २०११ साली ६६ टक्के झाली. मुस्लीम लोकसंख्या ८ टक्क्यांवरून २१ टक्के इतकी झाली. घुसखोरांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर दबाव येत आहे. आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या सुविधेवर ताण पडून स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या घुसखोरांमधील काही दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे यांची नावे निवडणूक यादीत टाकली जातात ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करत याच्याशी निगडीत सर्व समस्यांना मुळापासून उपटून काढण्याचे आदेश दिले आहेत.