इतरांकडून पैसे घ्या, पण मते ‘आप’ला द्या!
By Admin | Updated: January 19, 2015 05:47 IST2015-01-19T05:47:30+5:302015-01-19T05:47:30+5:30
भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या; पण आपली अमूल्य मते मात्र आम आदमी पार्टीलाच(आप) द्या

इतरांकडून पैसे घ्या, पण मते ‘आप’ला द्या!
नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या; पण आपली अमूल्य मते मात्र आम आदमी पार्टीलाच(आप) द्या, असे आवाहन पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे़ काँग्रेसने त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे़
पश्चिम दिल्लीच्या नवादा भागात रविवारी एका रॅलीला संबोधित करताना, केजरीवाल यांनी उपरोक्त आवाहन केले़ हा निवडणुकांचा काळ आहे़ भाजपा आणि काँगे्रसचे लोक पैसे देत असतील, तर खुश्शाल घ्या; पण मते मात्र आमच्याच पक्षाला द्या़ कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही पक्ष जनतेला लुटत आहेत़ कुणी २जी घोटाळ्यातून पैसे लाटले तर कुणी कोळसा घोटाळ्यातून पैसे मिळवले़ या पक्षाचे लोक तुमच्यापर्यंत आले नसतील तर, तुम्ही स्वत: त्यांच्या कार्यालयात जा़ आम्ही तुमची वाट पाहतोय, असे त्यांना सांगा़ गेल्या ६५ वर्षांपासून हे पक्ष आम्हाला लुटत आहेत, आता आपली पाळी आहे, असे केजरीवाल या वेळी म्हणाले़ विशेष म्हणजे त्यांच्या या वाक्यासरशी उपस्थित लोकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला़
भाषणात केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही ताशेरे ओढले़ रामलीला मैदानात मोदींच्या भाषणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही़ त्यांचा अर्धा वेळ मला नक्षली ठरवण्यात आणि माझ्या आंदोलनावर टीका करण्यातच गेला़ वैयक्तिक टीकेचे हे राजकारण योग्य नाही़ राजकारण हे मुद्द्यांवर आधारित असावे, असे ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)