नियंत्रण रेषेवरील दहशतवादाला आळा घाला, भारताचे पाकला खडे बोल
By Admin | Updated: March 9, 2017 17:10 IST2017-03-09T17:10:56+5:302017-03-09T17:10:56+5:30
भारतात सीमेपलीकडून होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर सैन्य ऑपरेशन्स महासंचालकां (डीजीएमओ)नी चिंता व्यक्त केली

नियंत्रण रेषेवरील दहशतवादाला आळा घाला, भारताचे पाकला खडे बोल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - भारतात सीमेपलीकडून होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर सैन्य ऑपरेशन्स महासंचालकां (डीजीएमओ)नी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात डीजीएमओ जनरल ए. के. भाटिया यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओंशी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील दहशतवादासंदर्भात गंभीर स्वरुपात चर्चा केली असून, काश्मीरमधल्या अवंतीपुरा भागातल्या पुलवामा जिल्ह्यात सुरू असलेल्या लष्कर आणि दहशतवाद्यांच्या कारवाईवर चर्चा झाली आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊ नये, असंही भाटिया म्हणाले आहेत.
पाकिस्ताननं दहशतवादाला आळा घातला पाहिजे. पाकिस्तान दहशतवाद्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. भारतात दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेल्या संशयित तरुणांना 10 मार्चला वाघा बॉर्डरवर सोपवण्यात येणार आहे. तसेच डीजीएमओंनी यावेळी दहशतवादावर चिंता व्यक्त केली आहे.
दोन तरुणांना उरी हल्ल्यानंतर पकडण्यात आलं आहे. या तरुणांवर उरी हल्ल्यातील दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र ते घरगुती भांडणामुळे भारतात दाखल झाल्याचे समोर आलं आहे. तसेच त्या तरुणांविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असंही लष्करानं सांगितलं आहे. एनआयएनं या दोन्ही दहशतवाद्यांना लष्कराच्या हवाली केले आहेत. त्यानंतर लष्कर या तरुणांना पाकिस्तानला सुपूर्द करणार आहे. फैजल हुसेन अवान आणि अशन खुर्शीद असं या तरुणांचं नाव आहे, अशी माहिती एनआयएनं दिली आहे.