बिबट्याच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: March 18, 2015 00:21 IST2015-03-18T00:07:44+5:302015-03-18T00:21:58+5:30
नेचर क्लबचे मुख्य वन संरक्षकास निवेदन

बिबट्याच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करा
नेचर क्लबचे मुख्य वन संरक्षकास निवेदन
नाशिक : चांदवड येथील कोंबडेवाडी परिसरातील राजेंद्र कासलीवाल यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला अप्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक साहित्याच्या अभावामुळे जीव गमवावा लागला. कोणत्याही वन्य प्राण्याला विहिरीत भूल न देण्याचे मार्गदर्शन तत्त्व असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांनी नियम धाब्यावर ठेवून केलेली कार्यवाही संशयास्पद आहे. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेतर्फेमुख्य वन संरक्षकांना निवेदनाद्वारे केली.
वास्तविक चांदवड येथील ऑपरेशन बिबट्यामध्ये प्रशिक्षित कर्मचारी असायला हवे होते. तसेच भुलीचे इंजेक्शन दिल्यावर बिबट्या खाली पडला, तर पाण्यात जाळी टाकणे अपेक्षित असताना असे न केल्यामुळे या बिबट्याला जीव गमवावा लागला. आश्चर्य म्हणजे नागरिकांसमोर भुलीचे इंजेक्शन दिले असताना आम्ही ते दिलेच नाही, असे म्हणणार्या अधिकार्यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. नाशिकमध्ये जखमी प्राण्यांसाठी रेस्क्यू सेंटर असावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे, मात्र याबाबत फारशी दखल घेतली जात नाही. दरम्यान, दोषींवर कारवाई न झाल्यास संस्थेचे कार्यकर्ते उपोषणाला बसतील, असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला. यावेळी विभागीय वनअधिकारी डी. डब्लू पगार यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, रमेश वैद्य, प्रमिला पाटील, रूपाली जोशी, अर्चना सोनवणे, गणेश जाधव, पुरु षोत्तम आव्हाड, उमेश नागरे, सुजाता पोरजे, प्रियंका काठे, इंद्रायणी नागरे, कोमल शिंदे, दर्शन घुगे, नीलेश सोनवणे आदि उपस्थित होते.
फोटो क्र. आर - फोटो - १७ बिबट्यानिवेदन