तहसीलदार तडवींचा कारागृहातील मुक्काम वाढला
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
जामीन अर्ज नामंजूर : सुरगाणा शासकीय धान्य घोटाळा प्रकरण
तहसीलदार तडवींचा कारागृहातील मुक्काम वाढला
जामीन अर्ज नामंजूर : सुरगाणा शासकीय धान्य घोटाळा प्रकरणनाशिक : सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय धान्य घोटाळ्यातील संशयित तहसीलदार रशिद इस्माईल तडवी यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल खडसे यांनी शनिवारी नामंजूर केला़ या प्रकरणात आणखी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, तडवींचा जामीन अर्ज नामंजूर झाल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून, त्यांच्यासह सहा संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत़सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुरगाणा शासकीय धान्य गुदामातील सुमारे ३६ टन धान्याचा अपहार करून ते काळ्या बाजारात विक्री केल्याने शासनाचे सव्वापाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दीड महिन्यापूर्वी सुरगाणा पोलीस ठाण्यात दिली होती़ यानुसार तहसीलदार रशिद तडवी, गुदामपाल भोये यांच्यासह सात जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़या धान्य अपहार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची संख्या बारावर पोहोचली आहे़ यातील सात आरोपी न्यायालयीन कोठडीत, तर आणखी पाच संशयितांना तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यामधील प्रमुख संशयित गुदामपाल भोयेला न्यायालयाने ११ मार्च, तर इतर चौघांना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले तहसीलदार तडवी यांनी शनिवारी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र तो नामंजूर करण्यात आला़(प्रतिनिधी)