स्वीमिंग पूल, मसाजर अन् बरेच काही...
By Admin | Updated: November 22, 2014 02:15 IST2014-11-22T02:15:07+5:302014-11-22T02:15:07+5:30
दशकापूर्वी हरियाणाच्या पाटबंधारे विभागात केवळ कनिष्ठ अभियंता म्हणून फारसा परिचित नसलेल्या स्वघोषित आध्यामिक गुरु रामपाल बाबा याच्या ऐषोरामी आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या बाबी समोर येत आहेत.

स्वीमिंग पूल, मसाजर अन् बरेच काही...
नवी दिल्ली : दशकापूर्वी हरियाणाच्या पाटबंधारे विभागात केवळ कनिष्ठ अभियंता म्हणून फारसा परिचित नसलेल्या स्वघोषित आध्यामिक गुरु रामपाल बाबा याच्या ऐषोरामी आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या बाबी समोर येत आहेत.
नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलेल्या रामपाल याने अगदी कमी काळात लोकप्रियतेसोबतच असंख्य भाविकांना वश करवून घेतले. त्याचा सतलोक आश्रम उद्ध्वस्त करण्यात आला असला तरी तेथील आलिशान आयुष्याच्या खाणाखुणा अजूनही साक्ष देत आहेत. या बाबाने कोट्यवधीची माया जमविली. महागड्या आलिशान कारचा ताफा त्याच्या दिमतीला होता. हरियाणातील बरवाला येथील १२ एकरांत पसरलेल्या या आश्रमाभोवतीचा वेढा तोडण्यात आल्यानंतर पोलिसांना आतमध्ये प्रवेश करता आला. आश्रमातील सभागृह वातानुकूलित असून तेथे भव्य एलईडी स्क्रीन लागलेले आहेत. रामपाल तेथेच भाविकांना संबोधत असे. त्याचे आसन बुलेटप्रूफ होते. खास गार्ड आणि भाविक त्याला संरक्षण देत असत. या आश्रमात वाचनालयापासून, तर छोट्या दवाखान्यापर्यंत सुविधा आढळल्या. रामपालच्या एकांतस्थळाच्या आत एक्स-रे रूम, युजीसी मशीन, बॉडी मसाजर, स्वीमिंग पूल, एवढेच नव्हे तर गावठी बॉम्बचा साठाही आढळला. पोलिसांनी रामपालला अटक करण्यासाठी नाकेबंदी केली तेव्हा आतून गावठी बॉम्बचा मारा करण्यात आला होता. आश्रमाच्या पाच मजली संकुलात रामपाल राहत होता. संकुलातील दारांना कुलपे होती. पोलिसांना दारे तोडून आतमध्ये प्रवेश करावा लागला. आतमधील सुखसाधने पाहता रामपालच्या ऐषोरामी आयुष्यावर प्रकाश पडला. या संकुलातील मध्यभागी मोठा स्वीमिंग पूल आढळला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)