शपथविधीपूर्वीच एनडीएत रुसवेफुगवे, पाकवरुन शिवसेना नाराज
By Admin | Updated: May 25, 2014 12:03 IST2014-05-25T12:03:18+5:302014-05-25T12:03:18+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रीत केल्याने एनडीएतील घटकपक्ष शिवसेना भाजपवर नाराज आहे.

शपथविधीपूर्वीच एनडीएत रुसवेफुगवे, पाकवरुन शिवसेना नाराज
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५ - नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच भाजपप्रणीत एनडीएत रुसवेफुगवे सुरु झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रीत केल्याने एनडीएतील घटकपक्ष शिवसेना भाजपवर नाराज आहे. शपथविधी सोहळ्याविषयी शिवसेनेची पुढील भूमिका ठरवण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे रविवारी संध्याकाळी शिवसेना पदाधिका-यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहेत. सोमवार २६ मेरोजी होणा-या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह सार्कमधील सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रीत केले आहे. मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रीत केल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएची सत्ता आल्यास भाजपसह शिवसेना नेतेही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ असे सांगत होते. मात्र निवडून येताच मोदींनी पाकिस्तानला निमंत्रीत केल्याने शिवसेना नेतृत्व भाजपवर नाराज आहेत. शिवसेनेने या सोहळ्याविषयी अद्याप मौन बाळगले आहे. नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार की नाही यावर शिवसेनेत विचारमंथन सुरु आहे. यासाठी रविवारी संध्याकाळी सहा वाजता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत शपथविधी सोहळ्यातील शिवसेनेच्या भूमिकेवरील निर्णय घेतला जाईल.
शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील १८ जागांवर झेंडा फडकावला आहे. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला मंत्रिपद येणार हे निश्चित आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या कोंडीवर काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. शिवसेनेचे आत्तापर्यंतचे विधान आणि पाकिस्तानविषयीची भूमिका हा केवळ राजकीय सोयीसाठी आहेत असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने पाकिस्तानला नेहमीच कडाडून विरोध केला आहे. मुंबईत पाकिस्तानसोबतचे क्रिकेट सामने होऊ देणार नाही, पाकिस्तान कलाकारांना मुंबईत येऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने नेहमीच मांडली आहे.