स्वराज यांनी योग्य तेच केलं - अरूण जेटली
By Admin | Updated: June 16, 2015 17:47 IST2015-06-16T17:34:43+5:302015-06-16T17:47:56+5:30
सुषमा स्वराज यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांनी जे केलं ते योग्यच केलं असे सांगत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्वराज यांची पाठराखण केली आहे.

स्वराज यांनी योग्य तेच केलं - अरूण जेटली
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - 'सुषमा स्वराज यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांनी जे केलं ते योग्यच केलं' असे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी विरोधकांनी सुषमा स्वराज व भाजपावर कायम ठेवलेला असतानाच सरकार मात्र ठामपणे स्वराज यांची पाठराखण करताना दिसत आहे.
'स्वराज आपल्या अधिकारात निर्णय घेऊ शकतात. त्यांनी जे केलं ते चांगल्या भावनेतूनचं केलं. याबाबत सरकार व पक्षाचे एकमत असून सरकार स्वराज यांच्या पाठीशी आहोत' असेही ते म्हणाले. तसेच अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ललित मोदी यांच्याविरोधातील अनेक खटल्यांचा तपास केला असून त्यापैकी अनेक प्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही जेटली यांनी सांगितले. या वादामागे भाजपातील अस्तनीतील साप असल्याचे ट्विट एका खासदाराने केले होते, त्याबद्दल जेटली यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर मौन बाळगणेच पसंत केले.
दरम्यान ललित मोदी यांना मदत केल्याचा वाद उफाळण्यापूर्वीच सुषमा स्वराज यांनी त्यांचा राजीनामा सादर केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा व संघ नेत्यांची चर्चा केल्यानंतर हा राजीनामा फेटाळून लावल्याची चर्चा आहे. स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन या प्रकरणाची त्यांना सविस्तर माहिती दिली होती. सरकारची नामूष्की होऊ नये म्हणून स्वराज यांनी राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र विचार विनिमय केल्यावर मोदींनी हा राजीनामा फेटाळून लावल्याची चर्चा रंगली आहे