घुमानदेशी मराठीचा गजर!

By Admin | Updated: April 3, 2015 01:00 IST2015-04-03T01:00:12+5:302015-04-03T01:00:12+5:30

८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. या सोहळ्यासाठी घुमाननगरी एखाद्या नववधूसारखी नटली आहे

Swamandh Marathi Marathi alarm! | घुमानदेशी मराठीचा गजर!

घुमानदेशी मराठीचा गजर!

संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरी/ घुमान (पंजाब) :
८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. या सोहळ्यासाठी घुमाननगरी एखाद्या नववधूसारखी नटली आहे. संमेलनाचा सर्व भार उचलेले पंजाब सरकारही मराठी साहित्यिक आणि रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व त्यांच्या कुटुंबीयांचे आज घुमानमध्ये आगमन झाले. गावकऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

मोरे गुरुवारी सकाळी सात वाजता पुण्यातील लोहगाव विमानतळावरून अमृतसरला आले. तेथून ते वाहनाने घुमानला पोहोचले. त्यांच्या आगमनामुळे अमृतसर तसेच घुमानमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी संमेलनस्थळी जाऊन स्वत: तयारीची पाहणी केली. पंजाबी माणसांनी केलेली तयारी पाहून ते भारावून गेले. डॉ. मोरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे याही अमृतसरमध्ये दाखल झाल्या आहेत.
पुणे आणि नाशिकहून निघालेल्या दोन रेल्वेगाड्या पोहोचण्याच्या आधीच अनेक साहित्यप्रेमी घुमानमध्ये दाखल झाले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिली. पुणे आणि नाशिकहून रेल्वेने येत असलेल्या साहित्यरसिकांची घुमानचे नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
गावात ठिकठिकाणी स्वागताच्या भव्य कमानी उभारण्यात आल्या असून पताकाही लावण्यात आल्या आहेत. याशिवाय गावातील गुरुद्वारांच्या प्रवेशद्वारांपाशी आणि महत्त्वाच्या रस्त्यांवरही रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहे. कमानींवर मराठी आणि पंजाबी भाषेत स्वागताचे संदेश लिहिण्यात आले आहेत. मराठी पाहुण्यांचे मराठमोळे स्वागत केले जात आहे. संमेलनाच्या प्रवेशद्वारांपाशी सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून मेटल डिटेक्टर्स बसविण्यात आले असून, आसपासच्या जिल्ह्यांमधूनही जादा पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. रसिकांच्या निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याचीही पंजाब सरकारने खास व्यवस्था केली आहे.
संमेलनाच्या वार्तांकनासाठी महाराष्ट्र तसेच दिल्लीहून मोठ्या प्रमाणावर पत्रकार येणार आहेत. त्यांच्या सुविधेसाठीही अद्ययावत कक्ष उभारण्यात आला आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठीतून बातम्या लिहिण्याची व्यवस्था असलेले ४० संगणक बसविण्यात आले असल्याचे देसडला यांनी सांगितले. घुमानमध्ये दोन आठवड्यांपूर्वी पाऊस झाला. दोन दिवसांपासून पाऊस थांबला आहे. तरी अचानक पावसाची अधून-मधून रिमझम सुरू आहे़ मात्र सभामंडप वॉटरप्रूफ असल्याने साहित्य रसिकांना संमेलनाचा आनंद घेण्यात कोणताही अडथळा येणार नाही़

Web Title: Swamandh Marathi Marathi alarm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.