मराठीला सुवर्णकमळ
By Admin | Updated: April 8, 2017 05:46 IST2017-04-08T05:46:13+5:302017-04-08T05:46:13+5:30
६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.

मराठीला सुवर्णकमळ
नवी दिल्ली : ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. ‘कासव’ हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, त्याला सर्वोच्च ‘सुवर्णकमळ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाने दिग्दर्शनासह तब्बल चार पुरस्कार मिळविले आहेत आणि दशक्रिया या चित्रपटाला ‘दशक्रिया’ सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेसह सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी चित्रपटाला पाचव्यांदा ‘सुवर्णकमळ’ पुरस्काराचा मान मिळाला आहे. या आधी ‘श्यामची आई’, ‘श्वास’, ‘देऊ ळ’ आणि ‘कोर्ट’ या चार चित्रपटांनाही ‘सुवर्णकमळ’ पुरस्कार मिळाला होता. कासव हा चित्रपट सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला असून, तो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा झाली. कासवशिवाय मराठी चित्रपट व्हेंटिलेटरसाठी राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि त्यांची आई मधू चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. व्हेंटिलेटरला सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट फायनल मिक्सड ट्रॅक हे असे एकूण चार पुरस्कारही घोषित झाले आहेत.
‘कासव’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ पटकावण्यासह अनेक मराठी चित्रपटांनी झेंडा रोवला. ‘दशक्रिया’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेसह सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट औरंगाबाद येथील लेखक बाबा भांड यांच्या दशक्रिया कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी मनोज जोशी याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सायकल चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ वेशभूषेचा पुरस्कार मिळाला.
मल्याळम अभिनेत्री उत्कृष्ट
प्रियदर्शन यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने मल्याळम चित्रपट ‘मिन्नामिनुन्गू- द फायरफ्लाय’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री सुरभी सी.एम. हिची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड केली. ‘धनक’ हा सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरला, तर ‘साथमनाम भक्ती’ या तेलुगू चित्रपटाने लोकप्रिय चित्रपटाच्या श्रेणीत बाजी मारली.
>दंगल, पिंक, नीरजा यांचाही गौरव
आमीर खानची भूमिका असलेल्या ‘दंगल’मधील काश्मिरी अभिनेत्री जायरा वसीमला सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला. अजय देवगणचा चित्रपट ‘शिवाय’ने सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट पुरस्कार आपल्या नावे केला.
राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गीस दत्त पुरस्कारासाठी आसामी चित्रपट ‘ढिक्चो बनत पलाष’ची निवड झाली. सोनम कपूरने हा नीरजाची पुरस्काराची निवड होणे हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.सोनमचा ‘नीरजा’ चित्रपट हिंदी चित्रपटांच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरला आहे. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या महिलाकेंद्रित चित्रपट ‘पिंक’ सामाजिक मुद्द्यांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
>अक्षयकुमार सर्वोेत्कृष्ट
गेली २५ वर्षे चित्रपटसृष्टी गाजविणारा अक्षयकुमार याला ‘रुस्तम’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पिंक’, ‘नीरजा’ व ‘दंगल’ या चित्रपटांनीही विविध महत्त्वपूर्ण श्रेणीत पुरस्कार पटकावले. अक्षयचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. १९५९ च्या नानावटी खून प्रकरणावर आधारित ‘रुस्तम’ या चित्रपटात त्याने देशभक्त नौसैनिकाची भूमिका साकारली होती.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल
अक्षय कुमारने एका व्हिडीओद्वारे टिष्ट्वटर आणि इंस्टाग्रामवर आभार मानले आहेत. या वेळी धन्यवाद हा खूपच छोटा शब्द आहे, परंतु मला जे वाटतेय, ते आणखी कशा पद्धतीने व्यक्त करू, हे मला कळेनासे झाले आहे, असे अक्षयकुमारने व्हिडीओत म्हटले आहे.
उत्कृष्ट कोकणी चित्रपट
पणजी : ‘के सेरा सेरा घडपाचे-घडटले’ या कोेकणी चित्रपटाला प्रादेशिक भाषेतील (कोकणी) उत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला, तसेच गोमंतकीय चित्रपट निर्माते आदित्य जांभळे यांना ‘आबा ऐकताय ना’ या चित्रपटास नॉन फिचर विभागात उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला.