तहकूब सभा पुढील आठवड्यात?
By Admin | Updated: January 2, 2015 01:01 IST2015-01-02T00:21:15+5:302015-01-02T01:01:07+5:30
सभेच्या तारखेवरून घोळ

तहकूब सभा पुढील आठवड्यात?
सभेच्या तारखेवरून घोळ
नाशिक : ३० डिसेंबर रोजी तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा पुढील आठवड्यात आठ किंवा नऊ तारखेला होण्याची शक्यता असून, सभा तहकुबीवरूनच सत्ताधार्यांमधील मतभेद उघड झाले होते. याच सभेत काही विषय पत्रिकेवर घेण्यावरून राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाल्याची चर्चा होती.
अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांची अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने त्यांनी सभेचे कामकाज चालू ठेवण्याबाबत काहीशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र नंतर सदस्यांचा व व्यासपीठावरील सहकार्यांचा एकूणच रोख पाहता त्यांना सभा तहकूब करावी लागली होती. याच सभेत काही महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्याची तयारी काही पदाधिकारी व सदस्यांनी ठेवल्याची चर्चा होती. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचाही जिल्हा परिषदेच्या सेस निधीतील जास्तीत जास्त कामांची मंजुरी या वर्षअखेर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यातच निधीच्या असमान वाटपावरून काही पदाधिकारी व सदस्यांमध्ये असंतोष असल्याची दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत चर्चा होती. जिल्हा परिषद सदस्य शंकर खैरे यांच्या निधनामुळे ही सभा तहकूब करण्याचा काही सदस्यांचा आग्रह असला तरी ते केवळ एक कारण होते. मात्र काही सदस्य व पदाधिकार्यांचा सभा तहकुबीकडे रोख होता, अशी आता चर्चा आहे. आता येत्या आठ किंवा नऊ जानेवारी रोजी ही तहकूब सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. कारण पुढील फेब्रुवारी महिन्यात अर्थ व बांधकाम सभापती व उपाध्यक्ष प्रकाश वडजे २०१४-१५ पुरवणी व २०१३-२०१४ चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पुन्हा विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)