हेमामालिनी यांच्यावर शस्त्रक्रिया
By Admin | Updated: July 4, 2015 02:43 IST2015-07-04T02:43:15+5:302015-07-04T02:43:15+5:30
राजस्थानातील दौसा येथे अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांच्या नाक व कपाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

हेमामालिनी यांच्यावर शस्त्रक्रिया
जयपूर : राजस्थानातील दौसा येथे अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांच्या नाक व कपाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात त्यांच्या कारचालकास निष्काळजीपणे गाडी चालविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रमेशचंद ठाकूर असे त्याचे नाव आहे.
आग्रा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर दौसानजीक गत रात्री हेमामालिनी यांच्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली होती. या अपघातात एका चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला होता, तर हेमांसह पाच जण जखमी झाले होते. या प्रकरणी हेमा यांचा कारचालक रमेशचंद ठाकूर यास शुक्रवारी कोतवाली ठाण्यात अटक करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पल्लवी शर्मा यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला.
अपघातानंतर ६६ वर्षीय हेमामालिनी यांना गुरुवारी रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे संचालक पी. तांबोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे नाक तसेच उजव्या डोळ्याच्या वर कपाळाला जखम झाली होती. नाकाच्या हाडाला दुखापत (मायनर फ्रॅक्चर) झाली होती. त्यामुळे मध्यरात्रीनंतर प्लास्टिक सर्जन संदीपन मुकुल यांनी त्यांच्या नाक आणि भुवयांच्या नजीक प्लास्टिक सर्जरी केली.
हे घाव भरण्यासाठी सहा आठवड्यांचा काळ लागेल. तूर्तास हेमा स्वस्थ आहेत. त्यांची कन्या ईशा त्यांच्यासोबत आहे. (वृत्तसंस्था)