एक पद, एक पेन्शनला हजारेंचा पाठिंबा
By Admin | Updated: July 27, 2015 00:13 IST2015-07-26T23:38:38+5:302015-07-27T00:13:46+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने ‘एक पद, एक पेन्शन’ योजनेच्या अंमलबजावणीसह एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही,

एक पद, एक पेन्शनला हजारेंचा पाठिंबा
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने ‘एक पद, एक पेन्शन’ योजनेच्या अंमलबजावणीसह एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही, असा आरोप करून समाजसेवक अण्णा हजारे यांनी लष्करी जवानांना त्यांच्या मागण्या पुढे रेटण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
एक पद, एक पेन्शनसाठी माजी सैनिकांनी रविवारी नवी दिल्लीत निदर्शने केली. त्यात स्वत: माजी सैनिक असलेले हजारेही सहभागी झाले होते. या मुद्यावर जनजागृती करण्यासाठी आपण देशभर दौरा करणार आणि त्यानंतर २ आॅक्टोबरला रामलीला मैदानावर आंदोलनही करणार, असे त्यांनी सांगितले.
हजारे पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदींनी आपल्या प्रचार सभांमध्ये ‘एक पद, एक पेन्शन’ योजनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापही हे आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर चांगले व्यक्ती आहेत. पण तेही आश्वासन पाळताना दिसत नाहीत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)