सनी लिओनी अडकणार पोलिसांच्या जाळ्यात ?
By Admin | Updated: February 8, 2017 10:34 IST2017-02-08T09:37:31+5:302017-02-08T10:34:03+5:30
सोशल मीडियाद्वारे अनेकांना 3 हजार 700 कोटी रुपयांचा गंडा घालणारा आरोपी अभिनव मित्तलने आयोजित केलेल्या पार्टीला उपस्थित राहिल्याने सनी लिओनी अडचणीत आली आहे.

सनी लिओनी अडकणार पोलिसांच्या जाळ्यात ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - सोशल मीडियाद्वारे तब्बल सात लाख लोकांना 3 हजार 700 कोटी रुपयांचा गंडा घालणारा आरोपी अनुभव उर्फ अभिनव मित्तलची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्स (STF)पाठोपाठ आता आयकर विभाग आणि ईडीदेखील एकत्र आले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चौकशीच्या फे-यात अडकण्याची शक्यता आहे. याचे कारण मित्तलने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सनी लिओनी उपस्थित होती. सनीचे या पार्टीचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या कारवाईप्रकरणी डीएसपी राज कुमार मिश्रा यांनी सांगितले की, '29 नोव्हेंबर रोजी पोर्टल लाँचचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या लॉचिंग पार्टीदरम्यान उपस्थित असलेल्या लोकांचीही चौकशी केली जाऊ शकते. ज्या हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, तेथील कर्मचा-यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत'.
या पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि अमिषा पटेलदेखील उपस्थित होत्या, त्या दोघींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण डीएसपी राज कुमार मिश्रा यांनी सांगितले की, प्राईज चिट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम अॅक्टनुसार, अशा प्रकारे एखाद्या योजनेचा प्रसार करणं बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना या घोटाळ्याबाबत काही माहिती होती, या अनुषंगाने सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घोटाळेबाज मित्तलच्या 12 बँक खात्यांमध्ये 524 कोटी रुपये जमा असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय ही कंपनी नोटाबंदीदरम्यान काळा पैसा खपवण्यासाठीचे माध्यमही असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या अनुषंगानेही घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर चौकशीदरम्यान ईडीने मित्तलच्या पाच ठिकाणांवर छापेमारी करत त्या जागांना टाळं ठोकले आहे.