Uttar Pradesh Crime : कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) आणि अभिनेते मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांच्या अपहरण प्रकरणात बिजनौरच्या लावी टोळीचे नाव समोर आले होते. यामध्ये टोळीचा म्होरक्या लावीसह 8 जणांना अटक करण्यात आली असून, इतर दोघे फरार आहेत. अंकित खन्ना उर्फ पहारी आणि शुभम, अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आता सोमवारी(दि.23) सायंकाळी उशिरा अंकित पहारीने रडत-रडत बिजनौर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
आरोपी अंकित खन्ना उर्फ पहारीने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठले अन् तिथे उपस्थित पोलिसांसमोर हात जोडून आणि रडत रडत अटक करण्याची विनवणी केली. चित्रपट कलाकारांचे अपहरण करुन मोठी चूक केल्याचे अंकितने कबूल केले. मेरठ पोलिसांनी त्याच्यावर 25 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. पण, आता आपली चूक लक्षात आल्यावर त्याने सरेंडर केले. आरोपीने रडत-रडत सरेंडर केल्यामुळे पोलिसही चक्रावले.
10 आरोपींची नावे समोर सुनील पाल, मुश्ताक खान, राजेश पुरी, गुरुचरण सिंग सोधी यांच्यासह अनेक अभिनेते आणि प्रसिद्ध व्यक्तींना कार्यक्रमात सहभागी होण्याच्या बहाण्याने मुंबईतून बोलावून त्यांचे अपहरण करायचे अन् करोडोंची रक्कम लुटायचे. या प्रकरणाचा तपास केला असता पोलिसांना बिजनौरच्या लावी गँगच्या दहा आरोपींचा सुगावा लागला. यामध्ये सार्थक उर्फ रिकी चौधरी, अझीम, सबीउद्दीन उर्फ सैफी, शिवा, आकाश उर्फ गोला, शशांक, अर्जुन कर्नावल, लवी उर्फ सुशांत चौधरी उर्फ हिमांशू यांचा समावेश असून यापैकी शिवा, आकाश, अर्जुन आणि लवी उर्फ सुशांत यांना वेगवेगळ्या पोलीस चकमकीत अटक करण्यात आली. चकमकीत चारही हल्लेखोरांच्या पायाला गोळी लागली होती. उर्वरित आरोपींना बिजनौरमध्ये पोलिसांनी पकडले. रविवारी रात्री उशिरा टोळीचा सूत्रधार लावी उर्फ सुशांत चौधरी आणि हिमांशू यांना बिजनौर पोलिसांनी अटक केली.
टोळीतील एक सदस्य अद्याप फरार दरम्यान, एन्काउंटरच्या भीतीने अंकित उर्फ पहारीने रडत रडत आपली चूक मान्य करत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. बिजनौरचे एसपी अभिषेक झा यांनी सांगितले की, आता या टोळीतील शुभम नावाचा एकच आरोपी फरार असून, टोळीचा म्होरक्या लावीचा चुलत भाऊ आहे. तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल. गँगस्टर कायद्यांतर्गत सर्व आरोपींवर कारवाई केली जाईल. यासोबतच हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याची शिफारस करण्यात येणार आहे.