सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट योग्यच -डॉ. गुप्ता
By Admin | Updated: July 3, 2014 10:22 IST2014-07-03T10:21:29+5:302014-07-03T10:22:46+5:30
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू 'नैसर्गिक' दाखवण्यासाठी दबाव आला होता असा गौप्यस्फोट करणा-या डॉ. सुधीर गुप्ता यांनी गुरुवारी घुमजाव केले आहे.

सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट योग्यच -डॉ. गुप्ता
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ - सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू 'नैसर्गिक' दाखवण्यासाठी दबाव आला होता असा गौप्यस्फोट करणा-या डॉ. सुधीर गुप्ता यांनी गुरुवारी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टम रिपोर्ट) योग्य असून यासंबंधी एम्स प्रशासनाची परवानगी घेतल्यानंतर मी याविषयी सविस्तर खुलासा करीन असे गुप्ता यांनी म्हटले आहे.
बुधवारी एम्सच्या फॉरेंसिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणात वादग्रस्त विधान केले होते. पुष्कर यांच्या शवविच्छेदनात त्यांचा मृत्यू नैसर्गिक दाखवण्यासाठी माझ्यावर तत्कालीन आरोग्य मंत्री आणि एम्समधील वरिष्ठ डॉक्टरांनी दबाव आणळा होता असा दावा डॉ. गुप्ता यांनी पत्रात केला होता. गुरुवारी डॉ. गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी यावादावर प्रतिक्रिया दिली. 'केवळ सुनंदा पुष्करच नव्हे तर मी तयार केलेले सर्व शवविच्छेदन अहवाल हे वैद्यकीय नियम आणि निकषांचे पालन करुन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यावर शंका घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही' अशी प्रतिक्रिया डॉ. गुप्ता यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणावर एम्स प्रशासनाची परवानगी घेऊनच सविस्तर भूमिका मांडीन असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.