सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे पाकिस्तान किंवा दुबई कनेक्शन ?
By Admin | Updated: November 14, 2014 10:16 IST2014-11-14T10:16:48+5:302014-11-14T10:16:48+5:30
सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपास आता पाकिस्तान आणि दुबईच्या दिशेने होत असल्याचे सूत्रांकडून समजते.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे पाकिस्तान किंवा दुबई कनेक्शन ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपास आता पाकिस्तान आणि दुबईच्या दिशेने होत असल्याचे सूत्रांकडून समजते. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला त्यादिवशी पाक व दुबईहून दिल्लीला आलेल्या व दिल्लीहून तिथे गेलेल्या प्रवाशांची यादी दिल्ली पोलिस तपासत आहे.
काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा जानेवरीमध्ये दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे व्हिसेरा तपासणीतून निष्पन्न झाले आहे. आता दिल्ली पोलिसांनी याप्रकरणीत पाक व दुबईतून येणा-या प्रवाशांची यादी तपासण्याचे काम सुरु केले आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूमागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आला आहे. मात्र याविषयी कमालीची गुप्तता बाळगली जात असून दिल्ली पोलिस दलातील एकाही अधिका-याने याविषयी अधिक भाष्य केलेले नाही.
दरम्यान, सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा तपासणीसाठी अमेरिकेतील एफबीआय किंवा स्कॉटलंडमधील प्रयोगशाळेत पाठवला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्सने दिलेल्या अहवालात मृत्यूचे कारण विषबाधा दिले असले तरी कशामुळे विषबाधा झाली हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता थेट स्कॉटलंड किंवा अमेरिकेतील तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले आहे.