सुलभाताईंनी साहित्यात वेगळेपण निर्माण केले

By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:54+5:302015-07-31T23:54:54+5:30

सुधीर पाठक : अभिव्यक्तीतर्फे सुलभाताई हेर्लेकर स्मृतिदिन

Sulabhataai created a variety of literature | सुलभाताईंनी साहित्यात वेगळेपण निर्माण केले

सुलभाताईंनी साहित्यात वेगळेपण निर्माण केले

धीर पाठक : अभिव्यक्तीतर्फे सुलभाताई हेर्लेकर स्मृतिदिन
नागपूर : सुलभाताई हेर्लेकर यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी उंची गाठली आहे. वैदर्भीयामधून ग्रेस आणि सुरेश भट यांच्यासारखे दिग्गज असतांनाही सुलभाताईंनी मराठी साहित्यात स्वत:चे वेगळेपण निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी व्यक्त केले.
सुलभाताई हेर्लेकर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त अभिव्यक्ती या वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे शुक्रवारी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित सुधीर पाठक बोलत होते. ते पुढे म्हणाले, सुलभाताईंच्या साहित्यात स्त्रीवादी भाव आणि निसर्गप्रेमाचे वर्णन आहे. त्यांच्या साहित्याचा आस्वाद घ्यावा असे नेहमी वाटायचे, कारण काहीतरी वेगळे देणारी लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. मात्र व्यक्ती म्हणूनही त्या ग्रेटच होत्या. त्यामुळेच त्यांच्या जाण्याला तीन वर्ष लोटूनही अभिव्यक्तीतर्फे त्यांच्या आठवणीत कार्यक्रम होणे, यातच सुलभाताईंच मोठेपण असल्याचे पाठक म्हणाले. याप्रसंगी अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी प्रास्ताविकातून सुलभाताईंच्या आठवणींना उजाळा दिला. सुलभाताईंनी समीक्षा केल्या, ललितबंध निर्माण केले, मात्र कविता हा त्यांचा पिंड होता. कवयित्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठी उंची गाठली. मात्र व्यक्ती म्हणून त्या अतिशय चांगल्या होत्या. स्वभाव अतिशय मृदु आणि लाघवी असला तरी पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा खंबीरपणाही त्यांच्यात होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे, अशा भावना अय्यर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सुलभाताईंच्या दूर दिव्याच्या सायंकाळी या ललितबंधातील काही अंश अभिनयरूपात सादर करण्यात आले. केतकी कुलकर्णी हिने मोगऱ्याचे झेले, मधुरा देशपांडे हिने मैत्रीचे घर व डॉ. शुभा साठे यांनी अंबादेवीच्या कुशीतले माहेरपण हे ललितबंधाचे अंश आपल्या सुरेख अभिनयाने श्रोत्यांसमोर सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अश्विनी पोफळे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना सुप्रिया अय्यर आणि हेमा नागपूरकर यांची होती.

Web Title: Sulabhataai created a variety of literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.