सुखोई विमानांचा ताफा जमिनीवर
By Admin | Updated: October 23, 2014 04:39 IST2014-10-23T04:39:50+5:302014-10-23T04:39:50+5:30
भारतीय हवाई दलाने सखोल तांत्रिक तपासणी करण्याकरिता रशियन बनावटीच्या सुखोई-३० एमकेई या विमानांच्या संपूर्ण ताफ्याची उड्डाणे तापुरत्या स्वरूपात बंद करण्याचे ठरविले आहे.

सुखोई विमानांचा ताफा जमिनीवर
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने सखोल तांत्रिक तपासणी करण्याकरिता रशियन बनावटीच्या सुखोई-३० एमकेई या विमानांच्या संपूर्ण ताफ्याची उड्डाणे तापुरत्या स्वरूपात बंद करण्याचे ठरविले आहे. यामुळे हवाई दलातील लढाऊ विमानताफ्यांची संख्या सुमारे एक तृतियांशाने कमी होणार आहे.
गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात थेऊरजवळ कोलवडी येथे सुखोई विमान कोसळले होते. सुदैवाने विंग कमांडर एस. मुंजे व फ्लार्इंग आॅफिसर अनूप सिंग हे सुखरूप बचावले होते. प्राथमिक तपासात हे विमान मानवी चुकीमुळे नव्हे तर तांत्रिक दोषामुळे कोसळल्याचे निष्पन्न झाले आहे.
२००९ पासून हवाई दलाने अशा प्रकारे पाच सुखोई विमाने गमावली आहेत. त्यामुळे हा तांत्रिक दोष काय आहे हे शोेधून त्याचे निराकरण होईपर्यंत, अधिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर सिमरन पाल बिर्डी यांनी ही माहिती दिली. पुण्यातील अपघातानंतर हवाई दलातील प्रत्येक सुखोई विमानाची कसून तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे व ती पूर्ण होईपर्यंत या विमानांची उड्डाणे स्थगित ठेवण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारतीय हवाई दलात सुखोई-३० जातीची सुमारे २०० विमाने आहेत. यापूर्वीही किमान दोनदा या विमानांच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती़
(लोकमत न्यूज नेटवर्क)