जेऐनयूत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: March 14, 2017 01:50 IST2017-03-13T22:17:23+5:302017-03-14T01:50:41+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना

जेऐनयूत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुथुकृष्णन उर्फ रजनी क्रिश (वय-25) असे त्याचे नाव असून तो जेएनयूमध्ये एमफीलचा विद्यार्थी होता. हैदराबादमध्ये गेल्या वर्षी आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाचं प्रकरण अजून चर्चेत असताना या घटनेमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीच्या मुनिरका विहारमधील रूम नंबर 196 मध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलिसांना, एका मुलाने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतल्याचा फोन आला त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ही घटना उघडकीस आली. दुपारी मुथुकृष्णन आपल्या मित्राच्या घरी गेला होता. जेवण झाल्यानंतर मी झोपायला जातोय असं त्याने आपल्या मित्राला सांगितलं आणि रूम बंद करून घेतली. त्यानंतर त्याला उठवण्यासाठी मित्रांनी ब-याच वेळेस आवाज दिला पण काही प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं. रजनी अनुसूचित जातीतील विद्यार्थी होता अशी माहिती तेथील विद्यार्थ्यांनी दिली आहे.
मुथुकृष्णन याने आत्महत्या का केली याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस या घटनेची चौकशी करत आहे. मुथुकृष्णन हा तामिळनाडूतील सालेमचा रहिवाशी आहे. रोहित वेमुलाला न्याय मिळवा यासाठी सुरू करण्यात आलेल्या चळवळीचा रजनी हा सक्रीय कार्यकर्ता होता. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.