सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
By Admin | Updated: March 10, 2016 16:49 IST2016-03-10T16:18:49+5:302016-03-10T16:49:41+5:30
सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १० - आयआरएनएसएस - १ एफ मालिकेतील सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे इस्त्रोने गुरुवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण केले. भारताच्या भरवशाच्या पीएसएलव्ही-सी ३२ प्रक्षेपकाव्दारे हे प्रक्षेपण करण्यात आले.
आयआरएनएसएस - १ एफ उपग्रहाचे वजन १४२५ किलो आहे. अवकाशातील कच-याबरोबर टक्कर टाळण्यासाठी एक मिनिट उशिराने ४ वाजून एक मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
आयआरएनएसएस मालिकेव्दारे भारत अमेरिकेच्या धर्तीवर स्वत:ची जीपीएस यंत्रणा विकसित करत आहे. आयआरएनएसएस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी चार उपग्रह पुरेसे आहेत. भारताचा हा सहावा दिशादर्शक उपग्रह आहे. उर्वरित तीन उपग्रहांमुळे आयआरएनएसएसचे काम अधिक अचूक आणि प्रभावी होणार असल्याचे इस्त्रोच्या अधिका-यांनी सांगितले.
उड्डाणानंतर वीस मिनिटांनी पीएसएलव्हीने आयआरएनएसएस - १ एफला अवकाश कक्षेत स्थिर केले. या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचा सर्वसामान्य वापरकर्त्यांना प्रवासामध्ये दिशा समजून घेण्यासाठी फायदा होणार आहे.
भारताला लागून असणा-या सर्व सीमांवरील १५०० किमीचा प्रदेश या उपग्रहाच्या कक्षेत येणार आहे. ही दिशादर्शक प्रणाली विकसित करण्यासाठी १४०० कोटी रुपयांचा खर्च आला असून, या मालिकेतील सातवा उपग्रह मार्च अखेरपर्यंत प्रक्षेपित करण्याची योजना आहे.