आयआरएनएसएस -१ सी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
By Admin | Updated: October 22, 2014 05:13 IST2014-10-22T05:13:20+5:302014-10-22T05:13:20+5:30
भारतीय अंतराळ संशोधनात आणखी एक पल्ला गाठताना इस्रोने गुरुवारी पहाटे तिसरा स्थितीदर्शक उपग्रह ‘आयआरएनएसएस १ सी’ चे पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले.

आयआरएनएसएस -१ सी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधनात आणखी एक पल्ला गाठताना इस्रोने गुरुवारी पहाटे तिसरा स्थितीदर्शक उपग्रह ‘आयआरएनएसएस १ सी’ चे पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या जीपीएसच्या तोडीची स्वत:ची स्थितीदर्शक यंत्रणा स्थापन करण्याकडे भारताने भक्कम पाऊल टाकले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन आणि ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्रोची प्रशंसा केली.
इस्रोने इंडियन रिजनल नेव्हिगेशन उपग्रह यंत्रणेअंतर्गत सात उपग्रह अवकाशात सोडण्याची योजना आखली असून आयआरएनएसएस १ सी हा उपग्रह त्याचाच एक भाग आहे. प्रथमच वर्षभरात चार यशस्वी प्रक्षेपण करण्याचा अनोखा मानही भारताने पटकावला आहे.
पहाटे १.३२ वाजता स्पेस पोर्टच्या पहिल्या लाँच पॅडवरून हा उपग्रह पाठीमागे अग्निज्वाळा सोडत अंधाऱ्या अवकाशात झेपावल्यानंतर २० मिनिटांनी पीएसएलव्ही प्रक्षेपकाने १४२५.४ किलो वजनाच्या उपग्रहाला नियोजित कक्षेत यशस्वीरीत्या सोडले.
पृथ्वीपासूनचे सर्वात कमी अंतर २८४ कि. मी., तर पृथ्वीपासूनचे सर्वाधिक अंतर २०,६५० कि. मी. अशा वर्तुळाकार कक्षेत १७.८६ अंशावर हा उपग्रह स्थिरावला तेव्हा प्रक्षेपण यशस्वी झाल्याबद्दल टाळ्या वाजवून वैज्ञानिकांनी आनंद व्यक्त केला. प्रक्षेपण यशस्वी झाल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिली. (वृत्तसंस्था)