जीसॅट-६चे यशस्वी प्रक्षेपण
By Admin | Updated: August 28, 2015 03:18 IST2015-08-28T03:18:55+5:302015-08-28T03:18:55+5:30
जीसॅट-६ हा भारताचा प्रगत दळणवळण उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात यश आल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) केली आहे.

जीसॅट-६चे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा : जीसॅट-६ हा भारताचा प्रगत दळणवळण उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात यश आल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) केली आहे. जीसॅट-६ या उपग्रहाचे जीएसएलव्ही-डी६ या रॉकेटच्या साहाय्याने गुरुवारी दुपारी ४.५२ वाजता आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जीएसएलव्ही-डी६ ने उपग्रह अंतराळात सोडल्याच्या १७ मिनिटांनंतर तो भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात यश आले आणि आमचे मिशन पूर्ण झाले, असे इस्रोने म्हटले आहे. या प्रक्षेपणापूर्वी २९ तासांआधी बुधवारी सकाळी ११.५२ वाजता उलटगणती सुरू करण्यात आली होती. स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनयुक्त जीएसएलव्ही-डी६ या यानाने २,११७ किलोग्रॅम वजनाच्या जीसॅट-६ या दळणवळण उपग्रहासह प्रक्षेपण केंद्राच्या दुसऱ्या लाँचिंग पॅडवरून अंतराळात झेप घतली. एस बँड आणि सी बँडच्या दूरसंचार यंत्रणेसाठी या जीसॅट-६ उपग्रहाचा वापर केला जाणार आहे.
हे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे एक प्रकारची ‘ओनम भेट’ असल्याचे मिशन संचालक आर. उमामेश्वरन म्हणाले. हे ‘खोडकर बाळ’ (क्रायोजेनिक इंजिन) आता इस्रोचे सर्वांत ‘लाडके बाळ’ बनले आहे. हे संपूर्ण चमूने केलेल्या प्रयत्नांचे यश आहे, असे ते म्हणाले.
अमेरिका, रशिया, जपान, चीन आणि फ्रान्सनंतर स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून दोन टनापर्यंतचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणारी इस्रो ही सहावी संस्था आहे.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
जीसॅट-६ दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. ‘जीसॅट-६ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन’, असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
उपग्रहावर सहा मीटर व्यासाचा अँटीना
जीसॅट-६ हा इस्रोने तयार केलेला २५ वा भूस्थिर उपग्रह आहे. हा उपग्रह अंतराळात नऊ वर्षांपर्यंत कार्यरत राहील. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी क्रायोजनिक इंजिनने बनविलेल्या जीएसएलव्ही रॉकेटचा वापर करण्याची ही तिसरी वेळ आहे.
याआधी इस्रोने ५ जानेवारी २०१४ रोजी जीएसएलव्ही-५ या रॉकेटद्वारे उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. या उपग्रहात १,१२५ किलो इंधने आणि ९८५ किलो वजनाच्या मूळ उपग्रहाचा समावेश आहे. तसेच या उपग्रहावर सर्वांत मोठा एस बँड अँटिना असून त्याचा व्यास सहा मीटर आहे.