जीसॅट १६ चे यशस्वी प्रक्षेपण
By Admin | Updated: December 7, 2014 09:28 IST2014-12-07T09:28:08+5:302014-12-07T09:28:08+5:30
दळवणळण क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी जीसॅट १६ या उपग्रहाचे रविवारी पहाटे फ्रान्समधील कौरु अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

जीसॅट १६ चे यशस्वी प्रक्षेपण
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ७ - दळवणळण क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी जीसॅट १६ या उपग्रहाचे रविवारी पहाटे फ्रान्समधील कौरु अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एरियन ५ या अग्निबाणामार्फत जीसॅट १६ला यशस्वीपणे कक्षेत स्थापित करण्यात आले आहे.
खराब हवामानामुळे जीसॅट १६ चे प्रक्षेपण दोन वेळा रद्द करावे लागले. अखेर आज पहाटे या उपग्रहाचे नियोजित वेळेनुसार प्रक्षेपण करण्याक आले. जीसॅट १६ या उपग्रहाचे वजन ३,१८१ किलो ऐवढे असून यामध्ये तब्बल ४८ ट्रान्सपोन्डर लावण्यात आले आहेत. एखाद्या उपग्रहामध्ये ऐवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोन्डर लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या उपग्रहामुळे भारतातील सरकारी व खासगी टीव्ही व रेडिओ सेवा, इंटरनेट आणि टेलिफोन ऑपरेशनचे सक्षमीकरण होईल. दळणवळण क्षेत्रात भारताची गरज पूर्ण करण्यासाठी इस्त्रोने यापूर्वी जीसॅट १४ डी हे उपग्रहही सोडले आहे.
इस्त्रोकडे सध्या दोन टनापेक्षा अधिक वजन असलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची क्षमता नसल्याने फ्रान्समधील अंतराळ केंद्राच्या मदतीने याचे प्रक्षेपण करण्यात आले.