काँग्रेसचे यश अन् विभाजन
By Admin | Updated: September 29, 2014 07:05 IST2014-09-29T07:05:45+5:302014-09-29T07:05:45+5:30
काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले.

काँग्रेसचे यश अन् विभाजन
काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली. त्यांच्यानंतर शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे या कालावधीत मुख्यमंत्री झाले. १९७७ साली प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमी झाल्याने इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या. काँग्रेसची याच काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अशी दोन शकले झाली. या दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. अर्स काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री; तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. पुढे शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठित ‘खंजीर खुपसून’ बंड केले आणि ‘पुलोद’चा प्रयोग करून स्वत:च मुख्यमंत्री झाले. पुढे दोनच वर्षांनी म्हणजे १९८० साली पुन्हा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ४४.५० टक्के मते मिळविताना २८८ जागांपैकी काँग्रेसने १८६ जागा मिळविल्या. ए.आर. अंतुले हे १९८२ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर हे या काळात मुख्यमंत्री राहिले. याच काळात काँग्रेसची पुन्हा दोन शकले झाली. १९८१ साली शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत समाजवादी काँग्रेसची स्थापना करीत निवडणूक लढविली. त्यांना ५४ जागा मिळाल्या. त्यानंतर १९९९ साली त्यांंनी नवीन पक्षाची स्थापना केली.