ऑनलाइन लोकमत
विजयवाडा, दि. 12 - वार्षिक परिक्षेत 10 पैकी 10 ग्रेड पॉईंटस मिळाले नाही म्हणून नवव्या इयत्तेत शिकणा-या एका विद्यार्थ्याने ट्रेनखाली उडी मारुन आत्महत्या केली. आंध्रप्रदेशच्या नल्लोर जिल्ह्यातील कावली शहरात मंगळवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. धामुल्लुरी विनय (14) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून रेल्वे ट्रॅकवर तो मृतावस्थेत आढळला.
विनय हुशार मुलगा होता तो नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळवायचा असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. विनयने जे आत्महत्येचे पाऊल उचलले त्यासाठी कुटुंबियांनी अप्रत्यक्षपणे शाळेकडे बोट दाखवले आहे. विनयवर शाळेकडून नेहमीच 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी दबाव टाकला जायचा असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
गीतांजली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणा-या विनयचा नवव्या इयत्तेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्याला 10 पैकी 9 ग्रेड पॉईंटस मिळाल्याने तो नाराज होता. विनय हुशार मुलगा होता पण शाळा व्यवस्थापन त्याच्यावर पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी दबाव टाकायचे असे कुटुंबियांनी सांगितले. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.