भारत,चीनमधील संबंध दृढ करण्यासाठी भरीव पावले
By Admin | Updated: February 3, 2015 02:12 IST2015-02-03T02:12:41+5:302015-02-03T02:12:41+5:30
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. परस्पर सहकार्यासंदर्भात भारत व चीन यांनी भरीव पावले उचलली असल्याचे यावेळी जिनपिंग यांनी सांगितले.

भारत,चीनमधील संबंध दृढ करण्यासाठी भरीव पावले
बीजिंग : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. परस्पर सहकार्यासंदर्भात भारत व चीन यांनी भरीव पावले उचलली असल्याचे यावेळी जिनपिंग यांनी सांगितले.
भारत व चीन यांच्यातील संबंधांच्या भवितव्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. भारत व चीन यांच्यातील परस्पर संबंधांबाबत यावर्षी चांगली प्रगती झाली आहे असे जिनपिंग म्हणाले. ग्रेट हॉल आॅफ पीपलमध्ये स्वराज व जिनपिंग यांची भेट झाली. (वृत्तसंस्था)
कैलास मानसरोवर यात्रा
1 भारत-चीन संबंध प्रगतीतील महत्त्वाचे पाऊल म्हणून कैलास मानसरोवर यात्रेसाठी नवा मार्ग खुला करण्यासंदर्भात रविवारी झालेल्या कराराचा त्यांनी उल्लेख केला. जूनपासून सिक्कीम तिबेट मार्गे ही यात्रा करता येईल. प्रवास अधिक सोयीचा झाल्याने ही यात्रा करणाऱ्या भारतीय यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होईल असे शी म्हणाले. शी यांनी सप्टेंबर महिन्यातील भारत दौऱ्यात मानसरोवरासाठी नवा मार्ग खुला करण्याचे आश्वासन दिले होते.
दुर्मिळ स्वागत
2 चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग कोणत्याही देशाच्या परराष्ट्र मंत्र्याचे क्वचितच स्वागत करतात, त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे स्वागत केले. याचाच अर्थ त्यांच्या मनात भारताबद्दल मैत्रीची दृढ भावना आहे असे मानले जात आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या शुभेच्छा सांगा असेही शी जिनपिंग यांनी सुषमा स्वराज यांना सांगितले.
नवे वळण
3 गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी भारताला भेट दिली, त्यानंतर चीन व भारत संबंधात नवे वळण आले आहे. भारत व चीन यांच्यात आता सकारात्मक नाते सुरू झाले आहे. दोन्ही देशांत सहकार्य सुरू झाले असून, त्यासाठी भरीव पावले उचलण्यात आली आहेत.
भारत भेटीची आठवण
4 या दौऱ्यात जिनपिंग गुजरातला गेले होते. भारत दौऱ्याच्या अनेक मधुर आठवणी माझ्याजवळ आहेत असे त्यांनी स्वराज यांना सांगितले. पंतप्रधान मोदी स्वत: माझ्याबरोबर गुजरातला आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही माझे स्वागत केले असे शी म्हणाले.