स्वराज यांचा भक्कम बचाव
By Admin | Updated: June 17, 2015 02:46 IST2015-06-17T02:46:49+5:302015-06-17T02:46:49+5:30
‘मोदीगेट’वरून गेले दोन दिवस रान उठवून विरोधकांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला असतानाच

स्वराज यांचा भक्कम बचाव
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
‘मोदीगेट’वरून गेले दोन दिवस रान उठवून विरोधकांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला असतानाच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी खास पत्रपरिषदेत मौन तोडत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा भक्कम बचाव करतानाच स्वत:विषयीच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान मंगळवारीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वराज यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरूच ठेवली. आयपीएलचे माजी आयुक्त घोटाळेबाज ललित मोदी यांना ब्रिटनमध्ये मदत केल्याबद्दल सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने आक्रमकपणे दबाव आणल्यानंतर संपूर्ण सरकारलाच घेरल्यामुळे बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या मोदी सरकारने मंगळवारी जेटलींसोबत गृहमंत्री राजनाथसिंह, ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी, एम.वेंकय्या नायडू आदींंनाही मैदानात उतरवले. राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जेटली आणि राजनाथसिंह यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबत गृह मंत्रालयात तासभर चर्चा केली. त्यानंतर राजनाथसिंह यांच्यासोबत जेटली यांनी संयुक्त पत्रपरिषद घेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सुषमा स्वराज यांनी चांगल्या उद्देशानेच ललित मोदींना मदत केली असून त्याबाबत होत असलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वत: स्वराज यांनी त्याबाबत निवेदन दिले असून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही तसे नमूद केले आहे. स्वराज यांचा हेतू प्रामाणिक होता. या मुद्यावर संपूर्ण सरकार आणि पक्षाची एकजूट आहे. त्याबद्दल कोणतीही शंका असायला नको, असे जेटली म्हणाले. या भरगच्च पत्रपरिषदेत जेटली यांच्या शेजारी राजनाथसिंह बसल्याचे चित्र बघायला मिळाले. स्वराज यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतंत्र निवेदनात म्हटले. ललित मोदी यांचे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी निकटचे संबंध असल्याची चर्चा आहे.