पाकिस्तानच्या कुरापतींवर तीव्र चिंता
By Admin | Updated: July 17, 2015 04:16 IST2015-07-17T04:16:11+5:302015-07-17T04:16:11+5:30
इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानातील परराष्ट्र विभाग तसेच दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसमक्ष शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांबद्दल

पाकिस्तानच्या कुरापतींवर तीव्र चिंता
नवी दिल्ली : इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानातील परराष्ट्र विभाग तसेच दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसमक्ष शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. बुधवारी पाकी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक महिला ठार तर सहा जण जखमी झाले होते.
तत्पूर्वी पाकिस्तानचे विदेश सचिव एजाज अहमद चौधरी यांनी इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्त टीसीए राघवन यांना विदेश विभागात पाचारण केले होते. बनचिरियन सेक्टरमध्ये काल भारताकडून झालेल्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाबद्दल चौधरी यांनी आक्षेप नोंदविल्याचे एका वक्तव्यात सांगण्यात आले.
भारताचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसले होते. पाकव्याप्त काश्मिरातील भिम्बर क्षेत्रात छायाचित्रे काढण्यासाठी या विमानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे हे ड्रोन विमान पाडण्यात आले, असाही दावा पाकने केला आहे. मात्र हे विमान पाकिस्तानचेच असावे, अशी माहिती समोर आली आहे.
डीजेआय फॅन्टम-३ हे ड्रोन विमान चिनी बनावटीचे असून, भारतीय संरक्षण यंत्रणेकडे चिनी बनावटीचे कुठलेही संरक्षण उपकरण अथवा साहित्य नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमान व्यावसायिक आहे. लष्करासाठी फारसे उपयुक्त नाही. पाकिस्तानात हे विमान सहज उपलब्ध असून, सर्वसामान्य लोकही ते खरेदी करतात. विशेष म्हणजे पाकिस्तानी पोलिसांकडूनही वाहतूक नियंत्रणासाठी या ड्रोनचा वापर केला जात असतो, असे समजते. (वृत्तसंस्था)
पाकची आगळीक सुरूच; नागरिकांमध्ये दहशत
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी सतत दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्याच्या काही गावांमध्ये तसेच सीमेवरील पाच चौक्यांवर तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. यात चार जण जण जखमी झाले असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मूच्या दौऱ्यावर येणार असून या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले.
बीएसएफ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाक सैनिकांनी आर.एस. पुरा सेक्टरजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी रात्री १.१५ वाजता लहान शस्त्रांनी गोळीबार आणि उखळी तोफा डागणे सुरू केले.