अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर, युक्रेनमधील शांतता प्रयत्नांसंदर्भात 'निराश' केल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प ब्रिटनच्या राजकीय दौऱ्यादरम्यान पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मॉस्को शांततेच्या दिशेने पुढे जाण्यास तयार नाही, हे रशियाने सिद्ध केले आहे -ट्रम्प यांचे हे विधान, रशियाने पोलंडच्या नाटो हवाई क्षेत्रात ड्रोन पाठवल्याच्या काही दिवसांनंतर आले आहे. रशियाचे हे ड्रोन नाटो सैन्याने पाडले होते. रशियाच्या आक्रमकतेवर कठोर शब्दात भाष्य करत ट्रम्प म्हणाले, नाटोच्या सीमांचे ड्रोनद्वारे उल्लंघन करून, मॉस्को शांततेच्या दिशेने पुढे जाण्यास तयार नाही, हे रशियाने सिद्ध केले आहे. बकिंघमशायरमधील चेकर्स येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत ट्रंप यांनी युक्रेन आणि गाझा या दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या युद्धासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, आपण हे संघर्ष सोडविण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहोत. परिस्थिती जटिल आहे, पण हे नक्की होईल."
पुतिन यांच्यासंदर्भात काय म्हणाले ट्रम्प? -ट्रम्प म्हणाले, मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही सात युद्धे सोडवली आहेत. अशी युद्धे जी सोडवणे कठीण होते, अमेरिकेने यांपैकी सात युद्धे सोडवली." पुतिन यांचा उल्लेख करत ते म्हणाले, "जे एक मी सर्वात सोपे समजलो होतो (युक्रेन युद्ध थांबवणे), ते... माझे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सोबतच्या संबंधांमुळे... मात्र त्यांनी मला निराश केले आहे आणि माझा विश्वास तोडला."