मोदींची प्रशंसा थांबवा - केरळ काँग्रेसची शशी थरूरना तंबी
By Admin | Updated: October 6, 2014 18:19 IST2014-10-06T17:10:08+5:302014-10-06T18:19:14+5:30
रेंद्र मोदींची स्तुती आता बास करा अशी तंबी खासदार शशी थरूर यांना केरळ काँग्रेसने दिली आहे.

मोदींची प्रशंसा थांबवा - केरळ काँग्रेसची शशी थरूरना तंबी
ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. ६ - नरेंद्र मोदींची स्तुती आता बास करा अशी तंबी खासदार शशी थरूर यांना केरळ काँग्रेसने दिली आहे. मोदींनी स्वच्छतेच्या अभियानामध्ये ९ जणांना सहभागी करताना त्यामध्ये शशी थरूर यांना स्थान दिले. यावर भाष्य करताना आपण हे निमंत्रण स्वीकारत असून मोदींनी आपली निवड करणं हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया थरूर यांनी व्यक्त केली होती. या घटनेबाबत भाष्य करताना केरळ काँग्रेसचे प्रवक्ते एम. एम. हसन यांनी सांगितले की थरूर हे बराच काळ मोदींचं कौतुक करत आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्याएवढं मोदींनी काय एवढं केलंय असा प्रश्न काँग्रेसजनांना पडल्याचं हसन यांनी सांगितलं.
अर्थात, याबाबत दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात येत नसली तरी हसन यांचे वक्तव्य म्हणजे थरूर यांना केरळ काँग्रेसने दिलेली तंबी असल्याचं मानलं जात आहे. थरूर यांची मोदींवरील वक्तव्ये काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे पक्षाचे केरळमधील उपाध्यक्ष सूरनाद राजशेकरन यांनी सांगितले आहे. या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देताना आपण हिंदुत्वाच्या अजेंडाच्या बाजुचे नसल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. मोदींबाबतची माझी वक्तव्ये राजकीय नसून व्यक्तिगत टिपण्णी असल्याचेही ते म्हणाले.