नारद मुनीसारखे वागणे बंद करा - जयराम रमेश
By Admin | Updated: January 14, 2016 00:16 IST2016-01-14T00:16:53+5:302016-01-14T00:16:53+5:30
काँग्रेसने देशातील आर्थिक परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना एकीकडे स्टार्टअप कार्यक्रमाच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न आशेचा किरण असल्याचे सांगितले

नारद मुनीसारखे वागणे बंद करा - जयराम रमेश
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेसने देशातील आर्थिक परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना एकीकडे स्टार्टअप कार्यक्रमाच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न आशेचा किरण असल्याचे सांगितले तर दुसरीकडे देशाची ढासळती अर्थव्यवस्था लक्षात घेत अर्थमंत्री अरुण जेटली यांना नारद मुनीचे काम करणे बंद करून अर्थमंत्रालयाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक पारित करून घेण्याबाबत काँग्रेसमध्ये कुठलेही दुमत नाही. मतभेद भाजपा व सरकारमध्येच असून या कारणामुळेच सरकार जीएसटी पारित करीत नसल्याचा दावा काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला. आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ जीएसटीला विरोध असणाऱ्या ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांची नामावलीच त्यांनी सादर केली. एवढेच नाहीतर गुजरात सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करीत या सर्वांना जीएसटी नको असल्याचे सांगितले.
मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था ढासळली असल्याचा जयराम रमेश यांचा आरोप होता. ते म्हणाले, मोदी केवळ नारेबाजी करतात तर जेटली ब्लॉग लिहितात. १५ नोव्हेंबरला औद्योगिक विकास दराने चार वर्षातील नीचांक गाठला. रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. येत्या १६ जानेवारीला सुरू होणाऱ्या स्टार्टअप कार्यक्रमासाठी काँग्रेसने सहा सूचना केल्या असून पंतप्रधान या कार्यक्रमास प्रारंभ करताना त्यांचा विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.