जेपी नड्डांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार वाराणसीत सापडली, दिल्लीतून गेली होती चोरीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 10:47 AM2024-04-07T10:47:13+5:302024-04-07T10:47:55+5:30

शाहिद आणि शिवांग त्रिपाठी यांना या फॉर्च्युनर कारच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे

Stolen car of BJP chief JP Nadda's wife recovered from Varanasi, 2 arrested | जेपी नड्डांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार वाराणसीत सापडली, दिल्लीतून गेली होती चोरीला 

जेपी नड्डांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार वाराणसीत सापडली, दिल्लीतून गेली होती चोरीला 

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चोरीला गेलेली फॉर्च्युनर कार वाराणसीमधून जप्त करण्यात आली आहे. ही कार दिल्लीतील गोविंदपुरी भागातून १९ मार्च रोजी चोरीला गेली होती. यानंतर चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केले होता. त्यानंतर पोलिसांनी कारचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडकल येथील रहिवासी शाहिद आणि शिवांग त्रिपाठी यांना या फॉर्च्युनर कारच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कार चोरण्यासाठी आरोपी क्रेटा कारमध्ये आले होते. फॉर्च्युनर कारची चोरी केल्यानंतर आरोपींनी बडकल येथे नेऊन कारची नंबर प्लेट बदलली. त्यानंतर अलिगढ, लखीमपूर खेरी, बरेली, सीतापूर, लखनौमार्गे वाराणसी गाठले. ही कार नागालँडला पाठवण्याचा आरोपींचा डाव होता. तसेच, कारच्या मागणीनंतर आरोपींनी कार चोरीचा प्लॅन आखला होता.

गेल्या महिन्यात १९ मार्च रोजी सर्व्हिस सेंटरमधूनच कार चोरीला गेली. कारची सर्विसिंग करण्यासाठी चालक जोगिंदर दिल्लीतील गोविंदपुरी येथे कार घेऊन गेला होता. यावेळी आरोपींनी कारची चोरी केली. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. चालक जोगिंदर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सेवा केंद्रात कार पार्क करून घरी जेवायला गेले होते, मात्र परत आल्यानंतर गाडी गायब होती. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, कार शेवटची गुरुग्रामकडे जाताना दिसली होती.

दरम्यान, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची घटना समोर येताच, याची राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा झाली होती. वाहन चोरीच्या घटना मागील काही दिवसांत वाढल्या आहेत. मात्र, सर्वसामान्य व्यक्तीची वाहन चोरीला गेल्यावर अनेकदा त्याची दखल देखील घेतली जात नाही. मात्र, आता थेट देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्नीचीच कार चोरीला गेल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. 

वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ!
राजधानी दिल्लीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (दिल्ली-एनसीआर) दर १४ मिनिटांनी वाहन चोरीची एक घटना घडते, असाही एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे. त्याचप्रमाणे ACKO ने काही दिवसांपूर्वी वाहन चोरीच्या घटनांवर आधारित 'थेफ्ट अँड द सिटी २०२४' ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये २०२२ आणि २०२३ दरम्यान भारतात वाहन चोरीच्या घटनांमध्ये २.५ पट वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती.
 

Web Title: Stolen car of BJP chief JP Nadda's wife recovered from Varanasi, 2 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.