‘हिंदू राष्ट्र’ वक्तव्य; नजमा यांचे घूमजाव
By Admin | Updated: August 30, 2014 03:01 IST2014-08-30T03:01:57+5:302014-08-30T03:01:57+5:30
सर्व भारतीय हिंदू असल्याचे वक्तव्य करून अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.

‘हिंदू राष्ट्र’ वक्तव्य; नजमा यांचे घूमजाव
नवी दिल्ली : सर्व भारतीय हिंदू असल्याचे वक्तव्य करून अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. मात्र, लगेच त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देऊन घूमजाव केले.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्रासंबंधी वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले होते. आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना नजमा शुक्रवारी म्हणाल्या की, माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. आपण सर्व भारतीयांना हिंदू नव्हे, तर हिंदी म्हटले होते. भारतात राहणाऱ्या नागरिकांना अरबी भाषेत हिंदी म्हटले जाते. या शब्दाचा वापर धर्माशी नव्हे, तर राष्ट्रीय ओळख म्हणून होता, असा खुलासा त्यांनी केला आहे. या वक्तव्यावरून नजमा यांच्यावर टीका झाली होती.
आम्ही हिंदी आहोत, राष्ट्रीय ओळख म्हणून आम्ही हिंदुस्थानी आहोत. हिंदी, इंडियन आणि हिंदुस्थानी सर्व एक आहेत, असे नजमा म्हणाल्या. नजमा हेतपुल्ला यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टीका केली. घटनेनुसार आमचा देश भारत आहे आणि येथे राहणारे सर्व नागरिक भारतीय आहेत, हिंदू नव्हे, असे तिवारी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी नजमा यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. नजमा यांच्या वक्तव्यानंतर हा वाद येथे मिटल्याचे भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)