राजपथावर महाराष्ट्राची वारी...लय भारी
By Admin | Updated: January 26, 2015 13:53 IST2015-01-26T13:52:53+5:302015-01-26T13:53:43+5:30
विठ्ठल विठ्ठल या गीताच्या तालावर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारे 'पंढरीची वारी' हे चित्ररथ राजपथावरील संचलनात लक्षवेधी ठरले.

राजपथावर महाराष्ट्राची वारी...लय भारी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - विठ्ठल विठ्ठल या गीताच्या तालावर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारे 'पंढरीची वारी' हे चित्ररथ राजपथावरील संचलनात लक्षवेधी ठरले. पंढरीच्या वारीसोबतच गोंधळ आणि लेझीम या लोकनृत्यांचा अविष्कारही ओबामांसमोर सादर करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत परेड पार पडली. या परेडमध्ये अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. महाराष्ट्राचा चित्ररथ 'पंढरीची वारी' या संकल्पनेवर आधारीत होता. महाराष्ट्राचे दैवत व तमाम वारक-यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगांच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन या चित्ररथातून घडले. चित्ररथाचे संकल्पना चित्र कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांची होती. सुमारे ६५ कारागिरांनी त्याची निर्मिती केली होती. अजय - अतुल यांच्या गाजलेल्या 'विठ्ठल विठ्ठल' या गाण्याच्या तालावर हे चित्ररथ राजपथावर अवतरले आणि अवघे राजपथ विठ्ठलमय झाले. केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ येताच उभे राहून कलाकारांचा उत्साह वाढवला.
ओबामांसमोर आमचे गाणे सादर होणे अभिमानास्पद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमोर आमचे गाण्यावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवले जाणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया संगीतकार अजय - अतुल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.