‘श्रमेव जयते’ योजनेचा थाटात प्रारंभ
By Admin | Updated: October 22, 2014 05:14 IST2014-10-22T05:14:43+5:302014-10-22T05:14:43+5:30
कामगार कायद्यांतील सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी ‘दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला़

‘श्रमेव जयते’ योजनेचा थाटात प्रारंभ
नवी दिल्ली : कामगार कायद्यांतील सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी ‘दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला़ या कार्यक्रमाअंतर्गत ‘श्रम सुविधा पोर्टल’, ‘लेबर इन्स्पेक्शन स्कीम’, तसेच भविष्य निर्वाह निधी (पीए) जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकच कायमस्वरूपी अकाऊंट नंबर (युनिव्हर्सल नंबर) या योजना त्यांनी जारी केल्या़
येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी ‘दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला़ यावेळी केंद्रीय श्रम रोजगार, पोलाद व खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री हर्षवर्धन, अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, लघु व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र आदी उपस्थित होते़
या सर्व योजना म्हणजे रालोआ सरकारच्या ‘किमान सरकार आणि कमाल सुशासन’च्या दिशेने केलेली सुरुवात असल्याचे मोदी यावेळी म्हणाले़ ‘सत्यमेव जयते’ची जेवढी शक्ती आहे तेवढीच शक्ती ‘श्रमेव जयते’ ची असणार आहे़ दुर्दैवाने आज देशात श्रम करून घाम गाळणाऱ्यांचा आदर केला जात नाही़ हे बदलायचे असेल तर आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे़ या दिशेने काही ठोस प्रयत्न झाले पाहिजे़ ‘श्रमेव जयते’ ही योजना याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले़ ‘लेबर इन्स्पेक्शन’द्वारे इस्पेक्टर राज संपुष्टात आणून अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवला जाणार असल्याचे ते म्हणाले़ सरकारने १६ फॉर्म (जे मालकाने भरायचे असतात) एका फॉर्ममध्ये बदलले आहेत आणि हा फॉर्म आॅनलाईन उपलब्ध आहे़ कोणता निरीक्षक कोणत्या कारखान्याचे निरीक्षण करणार ते आता संगणक ठरवेल़ निरीक्षणानंतर ७२ तासांत त्याला अहवाल अपलोड करावा लागेल़ सरकारच्या या सुधारणा हेच ‘किमान सरकार आणि कमाल सुशासन’ आहे, असेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)