सिंगारे स्वीकारणार स्थायी समितीची सूत्रे
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:13+5:302015-02-16T21:12:13+5:30
महापौरांची माहिती : आघाडीच्या नऊ सदस्यांच्या नावाची घोषणा

सिंगारे स्वीकारणार स्थायी समितीची सूत्रे
म ापौरांची माहिती : आघाडीच्या नऊ सदस्यांच्या नावाची घोषणा नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे रमेश सिंगारे स्वीकारणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेनंतर दिली. तत्पूर्वी यांनी सभागृहात स्थायी समितीच्या नऊ सदस्यांच्या नावांची घोषणा केली. यात आघाडीचे रमेश सिंगारे, शरद बांते, संजय बालपांडे, श्रावण खापेकर, गोपी कुमरे, कांता लारोकर, विशाखा मैंद, नीता ठाकरे व किशोर डोरले यांच्यासह बसपाचे किशोर गजभिये, राष्ट्रवादीचे कामील अन्सारी व शिवसेनेचे जगतराम सिन्हा आदींचा समावेश आहे. स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. ज्येष्ठतेच्या आधारावर दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होतात. परंतु अधिकाधिक सदस्यांना संधी मिळावी यासाठी एक वर्षातच सदस्यांचा राजीनामा घेतला जातो. भाजपच्या कोर कमिटीने स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सिंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. नगरसेवकांच्या संख्याबळाच्या आधारे आघाडीच्या नऊ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. इतर सदस्यांचीही नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची नावे पुकारण्यात आली. उर्वरित चार सदस्यांचे राजीनामे व नवीन नावांची घोषणा पुढील सभेत करणार असल्याचे दटके यांनी सांगितले. (प्रतिनिधी )चौकट...मी पक्षाचा कार्यकर्तामी पक्षाचा कार्यकर्ता आहे. जी जबाबदारी सोपविली जाईल, ती प्रामाणिकपणे पार पाडू. समितीच्या माध्यमातून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया रमेश सिंगारे यांनी दिली.चौकट...शिवसेना संभ्रमातसंख्याबळाच्या आधारे शिवसेनेच्या एका सदस्याची स्थायी समितीवर निवड होऊ शकते. बंडू तळवेकर निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी जगतराम सिन्हा यांचे नाव गटनेत्या शीतल घरत यांनी दिले. परंतु अलका दलाल यांनी यावर आक्षेप घेत गटनेतेपदी किशोर कुमेरिया यांची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्तांना याबाबतचे पत्र दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. परंतु सचिव हरीश दुबे यांनी आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारचे पत्र मनपाला प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. अखेर सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.